
दैनिक स्थैर्य । 28 एप्रिल 2025। फलटण । फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या विवादित प्रकरणाची पुढील सुनावणी दि. ०२ मे २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. आज निर्धारित सुनावणी होणार होती, परंतु आता पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा विवाद श्रीराम साखर कारखान्यावरील निवडणुकीच्या प्रक्रियेवर केंद्रित आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदार यादीबाबतच्या वादामुळे गेल्या काही काळापासून तिथे विवाद निर्माण झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली होती, ज्याच्याविरोधात कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी उच्च न्यायालयात दाद मागत प्रशासकाची नियक्ती हटवली होती.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सरकारी प्रशासकाची नियुक्ती रद्द करण्यात आली, ज्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाकडे कारखान्याचा कारभार सुपूर्त करण्यात आला होता. आता ही पुढील सुनावणी कारखान्याच्या निवडणुकीच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी मागवला “श्रीराम”कडून अहवाल
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्याकडे केलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने प्रादेशिक सहसंचालक (साखर) अविनाश देशमुख यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्याकडे तक्रारी अर्जात नमूद केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने दि. १६ मे २०२५ रोजी अहवाल स्वतः सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.