
दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२५ | दुबई |
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने आपला विजयी मोहिम सुरू ठेवली आहे. ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामनाही जिंकला. गेल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला. यासह, टीम इंडियाने स्पर्धेत सलग तीन विजय मिळवले. या विजयासह, भारताने आपल्या गटात पहिले स्थान मिळवले आणि पहिल्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. टीम इंडियाच्या विजयाचा स्टार वरुण चक्रवर्ती होता, ज्याने ५ विकेट्स घेत न्यूझीलंडला विजयापासून रोखले. या स्पर्धेत न्यूझीलंडचा हा पहिलाच पराभव आहे.
आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणार्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या गट सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. उपांत्यफेरीसाठी चार संघ आधीच निश्चित झाले होते, पण आता कोणता संघ कोणाविरुद्ध खेळेल हे पाहणे बाकी होते. हे भारत-न्यूझीलंड सामन्याच्या निकालावरून ठरवायचे होते. दुसर्या गटापूर्वीच, दक्षिण आफ्रिकेने पहिले स्थान मिळवले होते, तर ऑस्ट्रेलिया दुसर्या स्थानावर होता. टीम इंडियाच्या विजयामुळे आता चित्र स्पष्ट झाले आहे, जिथे भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल, तर न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.
वरुण चक्रवर्ती ठरला विजयाचा शिल्पकार
भारत-न्यूझीलंड संघांमधल्या सामन्यात गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५० धावांचं माफक आव्हान होतं. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी न्यूझीलंडचा अख्खा डाव २०५ धावांत गुंडाळला. लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती भारताच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं ४२ धावांत न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी धाडला. कुलदीप यादवनं दोन, तर अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजानं एकेक विकेट काढली.
श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलचा तडाखा!
त्याआधी न्यूझीलंडच्या प्रभावी आक्रमणासमोर भारतीय फलंदाजांना ५० षटकांत नऊ बाद २४९ धावांचीच मजल मारता आली. या सामन्यात न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने ४२ धावांत भारताचा निम्मा संघ गुंडाळला. शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तीन प्रमुख फलंदाज तर स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे भारताची तीन बाद ३० अशी बिकट अवस्था झाली होती. त्या परिस्थितीत श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलनं चौथ्या विकेटसाठी ९८ धावांच्या भागीदारी रचली. त्यामुळे भारतीय डावाला आकार आला. श्रेयस अय्यरनं ९८ चेंडूंत ७९ धावांची खेळी उभारली. अक्षर पटेलनं ६१ चेंडूंत ४२ धावांची खेळी केली. मग हार्दिक पंड्यानं ४५ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह ४५ धावांची खेळी उभारून भारताला अडीचशे धावांच्या जवळ नेलं.