“नवीन वर्ष, उत्तम आरोग्य” : डॉ. प्रसाद जोशींचे मार्गदर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 01 जानेवारी 2025 | फलटण | जेव्हा २०२४ चे वर्ष मावळत आहे आणि २०२५ ची नवी पाहट उगवत आहे, तेव्हा मागील वर्षाकडे वळून पाहताना अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी आरोग्याच्या बाबतीत महत्त्वपूर्ण संकल्प घेण्याचे आवाहन केले आहे.

मागील वर्षाचा मागोवा आणि नवीन वर्षाची तयारी

वर्षाच्या शेवटी नेहमीच असे वाटते की हे वर्ष फार भरभर गेले. मागे वळून पाहताना या वर्षातील घडामोडी डोळ्यासमोरून जातात. काय गमवले, काय मिळविले आणि आपल्या जीवनाच्या टप्यावर कुठे येऊन पोहोचलो आहे याचा एक मागोवा घेणे गरजेचे आहे. डॉ. प्रसाद जोशी म्हणतात, “आपणच आपल्या आरोग्याची पुरती वाट लावलेली आहे. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव आणि नको-त्या सवयी लावून आपणच आपले आरोग्य वेशीवर टांगले आहे.”

आरोग्याचे प्रमुख घटक

  1. सूर्योदय बघणे आणि सूर्य किरणांचा लाभ : डॉ. जोशी सांगतात, “उगवत्या सूर्याकडे बघितले की एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा मिळते. सूर्य उगवल्यानंतर एक तासाच्या आत सूर्य किरणे अंगावर घेतलीत तर नॅचरल व्हिटामिन डी आपल्या शरीरात त्वचेच्या आत तयार होते आणि बरेच आजार टाळता येतात जसे की ऑस्टियोपोरोसिस, कॅल्शियम डेफिसिअन्सी आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम सुध्दा टाळता येतात.”
  2. नित्य व्यायाम : “रोज आणि नित्यानियमने अर्धा ते एक तास व्यायाम कराल. प्रत्येकाची क्षमता वेग-वेगळी असते, ती ओळखून आपण रोज व्यायाम केला पाहिजे. मग ते सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, चालणे, पळणे, सायकलिंग, पोहणे अथवा कुठलाही खेळ खेळणे असो. फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग आणि एरोबिक्स याचा योग्य समन्वय साधणे गरजेचे आहे,” असे डॉ. जोशी स्पष्ट करतात.
  3. शुद्ध, सात्विक आणि शाकाहारी आहार :”आपले शरीर आणि पचनसंस्था ही मांसाहारी साठी बनलेली नाही. मांसाहारानी फक्त जिभेचे चोचले पुरवले जातात आणि मग शरीराला अपचन झाल्याने दुष्परिणाम भोगावे लागतात. घरी बनवलेले, शुद्ध, सात्विक आणि शाकाहारी अन्न घेणे केव्हाही आरोग्यदायीच ठरते. बाहेरील जंक फूड्स ही टाळलेलीच बरी नाही का?” असे ते नमूद करतात.
  4. सहा ते सात तास रात्री शांत झोप : “लवकर झोपे आणि लवकर उठे त्याला आरोग्य आणि समाधान लाभे. बिछान्यावर पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे असे सर्वांनाच वाटते पण अशी सुखाची झोप किती लोकांच्या वाट्याला येते. ती यावी म्हणून आपण किती प्रयत्न करतो हे आपणच आपल्याला विचारा रात्रीच्या शांत झोपेनी शरीर आणि मन ताजे तवाने आणि टवटवीत होते. एक नवी उमेद आणि नवीन ऊर्जा येते आणि शरीराची ऊर्जा संचयित होते.”
  5. मनाची मशागत : “मन करारे प्रसन्न. मन आनंदी असेल तर कुठल्याही कामाचा ताण येत नाही. शेवटी सगळाच ‘माइंड गेम’ असतो. टेक इट ईजी, मेक इट ईजी. कुठल्याही आजाराची उत्पत्ती मनामधूनच होते असे शास्त्रांनी सुद्धा सिद्ध केले आहे. ज्याची विल पॉवर उत्तम तो कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार असतो. त्यामुळे मन शांत आणि प्रसन्न ठेवण्यासाठी मेडिटेशन महत्त्वाचे ठरते. आपण कोण आहोत, या जगात का आलो आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहेत याचे आत्मपरीक्षण सर्वांनीच केले पाहिजे.”

डॉ. प्रसाद जोशी म्हणतात, “नवीन वर्षात अजून बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत पण बस एवढ्या पाचच गोष्टी या नवीन वर्षात नित्यानियमनी करा. बघा आयुष्य कसे बदलून जाते ते!! आजार झाल्यावर निस्तरण्यापेक्षा तो होऊच नये !! बरोबर ना? ‘मग निरामय भरित । पावती पद अच्युत ।'”

४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे

फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.

संपर्क : 8888006611 (WhatsApp)

Back to top button
Don`t copy text!