दैनिक स्थैर्य | दि. ०२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | जिल्हय़ात मतदार नोंदणी पुररिक्षण कार्यक्रम 2022 मोहिमेस आरंभ झाला असून त्यानुसार एकत्रीकृत प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्हय़ातील 18 वर्षांपुढील नवीन मतदारांनी नोंदणी करावी. यासाठी नोव्हेंबर महिन्यात 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिली.
नवीन मतदार नोंदणी कार्यक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी शेखरसिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे उपस्थित होत्या.
शेखरसिंह यांनी सांगितले की, जिल्हय़ात मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 980 एवढी असून पुरुष मतदारांची संख्या 12 लाख 92 हजार 640 तर महिला मतदार संख्या 12 लाख 33 हजार 499 अशी जिल्हय़ाची एकूण मतदार संख्या 25 लाख 26 हजार 115 एवढी आहे. यामध्ये सेना दलातील मतदार संख्या 12 हजार 987 एवढी असून तृतीपपंथी 56 मतदार आहेत.
दि. 1 नोव्हेंबरपासून नवीन मतदार नोंदणी, मतदार संघ स्थंलातर, अनिवासी मतदार, दुरुस्ती आदी बाबी मतदार नोंदणी मोहिमेत करण्यात येणार आहेत. यामध्ये दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. यामध्ये 16 नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. 20 डिसेंबर 2021 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. तर 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे शेखरसिंह यांनी सांगितले.
अशा प्रकारे करु शकता मतदार नोंदणी
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी www.nvsp.in, https//voterportal.gov.in, VAH या व्होटर हेल्पलाईनवरुन नोंदणी करता येईल. तर ज्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यात अडचण आहे त्यांना संबंधित मतदार नोंदणी कार्यालयात जावून अर्ज भरुन नाव नोंदणी करता येणार आहे. नाव नोंदवताना जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी, बारावी गुणपत्रिका, पॅनकार्ड, आधारकार्ड यापैकी एक वयाच्या पुराव्यासाठी व निवास पुराव्यासाठी बँक पासबुक, रेशनकार्ड, भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, पाणी, वीज बिल यापैकी एक दस्तऐवज द्यावा लागेल, असेही शेखरसिंह यांनी सांगितले.