
दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । सातारा । जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध करुन देण्यात आली असून यातून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 अंतर्गत सातारा पोलीस दलासाठी खरेदी करण्यात आलेल्या साधनसामुग्रीचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे, सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल आदी उपस्थित होते.
पोलीस विभागाला अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने चांगले निर्णय घेतले आहेत. गुन्हेगारीचे स्वरुप बदलत चालले आहे. बदलती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस विभाग आधुनिक होणे आवश्यक आहे यासाठी 72 संगणक संचही पोलीस दलाला देण्यात येत आहे. बाजार पेठेतील दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. दुकानदारांना दुकानाच्या बाहेर रस्त्याच्या दिशेने कॅमेरा लावण्याची मोहिमही पोलीस विभागाने हाती घ्यावी, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.