
स्थैर्य, फलटण, दि. २९ सप्टेंबर : फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या ‘मनोमिलना’च्या चर्चेला एक नवे वळण मिळाले आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी रात्री बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सध्या फलटण तालुक्यात दोन प्रमुख राजकीय गटांचे मनोमिलन होणार असल्याची चर्चा सुरू असून, यासाठी विविध ठिकाणी बैठका झाल्याचेही बोलले जात आहे. हे मनोमिलन केवळ स्थानिक पातळीवर होणार की वरिष्ठ पातळीवर, याबाबत स्पष्टता नसतानाच, या नव्या भेटीची बातमी समोर आल्याने राजकीय विश्लेषकही संभ्रमात पडले आहेत.
आतापर्यंत ‘राजे गट’ भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीच भेट झाल्याची चर्चा सुरू झाल्याने, ‘राजे गट’ नक्की भाजपमध्ये जाणार की पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होणार, यावरच उलटसुलट चर्चा झडत आहेत. या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल, मात्र या घडामोडींनी फलटणचे राजकारण तापले आहे, हे निश्चित.