स्थैर्य, फलटण, दि. ५ : कोरेगाव पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार वसंत साबळे यांनी सातारा पोलीस मुख्यालय ते कोरेगाव पोलीस ठाणे हे २९ कि. मी. अंतर धावत जाऊन सेवानिवृत्ती स्वीकारली त्यानंतर कुटुंबासह पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करुन आपल्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलीस दलाचा निरोप घेतला.
वडूथ ता. सातारा येथील मूळ रहिवासी असलेले वसंत साबळे यांनी सन 1984 मध्ये पोलिस दलात सहभागी होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली. अत्यंत उत्तम पद्धतीने कार्यरत राहुन केलेल्या कामाबद्दल वसंत साबळे यांना आतापर्यंत सुमारे पाचशे पन्नास पेक्षा जास्त बक्षिसे, सन्मानपत्र व सुमारे दोन लाखाहुन अधिक रोख बक्षिसे, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, दोन जादा वेतन वाढी, दोन वेळा राष्ट्रपती पोलीस पदक तसेच राज्यस्तरीय मानवाधिकार पुरस्कार देऊन त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला आहे. दोन वेळा राष्ट्रपती पोलीस पदक मिळविणारे ते महाराष्ट्रातील एकमेव पोलीस कर्मचारी आहेत.
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची अत्यंत आवड असणाऱ्या वसंत साबळे यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी वृक्षारोपण करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपला वाढदिवस किंवा राष्ट्रीय सणाचे औचित्य साधून मित्रमंडळी व कुटुंबीयांसमवेत सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे उपक्रम त्यांनी सतत राबविले आहेत. वडूथ येथील आपल्या शेतामध्ये ओढ्याच्या काठी आंबा, चिकू, सिताफळ, पेरु, अंजीर वगैरे फळझाडांची लागवड करुन त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. निसर्गाचा समतोल वृक्षारोपणाद्वारे राखणारे एक कृतिशील नागरिक म्हणून त्यांचा यापूर्वी अनेक वेळा सन्मान झाला आहे.
कबड्डी, हॉलीबॉल, पोहणे व धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन वसंत साबळे यांनी यापूर्वी अनेक बक्षिसे मिळविली आहेत. अरबी समुद्रातील चिवला खाडी येथे प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या जलतरण स्पर्धेत तसेच गोंदिया व अमरावती येथील राज्यस्तरीय आणि सिकंदराबाद येथील राष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धेत सहभागी होत सिकंदराबाद येथील ऑल इंडिया स्विमिंग चॅम्पियशिप मध्ये गोल्ड मेडल मिळवून पोलीस दलाचे नाव उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न वसंत साबळे यांनी केला आहे.
पोलीस दलात विविध ठिकाणी काम करताना कराड येथील नरेश म्हस्के खून प्रकरण, पै. संजय पाटील खून खटला, वाई हत्याकांडातील संशयित संतोष पोळ तपास, मांढरदेव दुर्घटना चौकशी वगैरे गाजलेल्या अनेक खटल्यातील तपासकामी वरिष्ठांना सहकार्य तसेच लक्षावधी रुपयांची अपहार प्रकरणे, अवैध पिस्टल रिव्हॉल्वर जप्त, मोक्का कारवाई, अफरातफरी व सावकारी गुन्हे, दरोडे, चोरी वगैरे गुन्ह्यांच्या तपासकामी त्यांनी उत्तम काम केले आहे. विशेष सरकारी वकील अड. उज्वल निकम यांना न्यायालयातील खटल्या कामी केलेले सहकार्य वगैरे अनेक बाबी गेल्या छत्तीस वर्षातील सेवेत उत्तम प्रकारे पूर्तता करुन वसंत साबळे यांनी वाहवा मिळविली आहे.
कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गोडसे, सपोनि साळुंखे, सपोनि कदम व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्तीनिमित्त वसंत साबळे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. सत्कारापूर्वी पोलीस मुख्यालय ते कोरेगाव पोलीस ठाण्यापर्यंत धावत येताना त्यांच्यासमवेत पोलीस हवालदार केशव फरांदे, संजय शिर्के, हेमंत मुळीक वगैरे सहकारी होते.