
स्थैर्य, फलटण, दि. ३१ ऑक्टोबर : फलटण येथील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांना पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट प्रसिद्धीस देण्यासाठी आता नव्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. यापुढे पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फतच माध्यमांशी अधिकृत संपर्क साधावा लागणार असून, माध्यम कार्यात पारदर्शकता व जबाबदारी आणण्यासाठी ही नवी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या नियमावलीनुसार, पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट आयोजनासाठी आगाऊ माहिती पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देणे बंधनकारक राहील. माहिती देताना सत्यता, संयम आणि जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
आचारसंहितेच्या निकषांनुसार, संबंधित बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार त्या त्या वृत्तपत्रांना राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, अनधिकृत व्यक्तींनी किंवा नोंदणीकृत माध्यमांच्या बाहेरील घटकांनी माहिती प्रसिद्ध करू नये, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
पत्रकार आणि सामाजिक व राजकीय संघटनांमधील सुसंवाद राखण्यासाठी ही नियमावली महत्त्वाची ठरेल, असे मत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेसंदर्भात अधिक माहितीसाठी यशवंत खलाटे-पाटील (9421213656, 9822973344) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					