स्थैर्य, सातारा दि. 21 : सातारा येथील नवनित अपार्टमेंट गुरुवार पेठ,सातारा नगरपालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने. सातारा येथील या ठिकाणच्या क्षेत्रात पुढील आदेशाप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, सातारा उपविभाग, सातारा मिनाज मुल्ला यांनी सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत.
त्यानुसार बाधित क्षेत्रातील आपत्कालीन व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्याकरीता अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलेल्या क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा व वस्तू पुरवठा करण्याकरीताची वेळ ही जिल्हा दंडाधिकारी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशाप्रमाणे राहील. या परिसरात जीवनावश्यक वस्तुंचा, अत्यावश्यक सेवा पुरविणारे कार्यालय व व्यक्तींना, व त्यांच्या वाहनांना यामधून वगळण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तु व सेवा (दुध व दुग्धोत्पादन, किराणा माल, फळे व भाजीपाला इ.) यांच्या वाहतूकीसाठी कोणतेही निर्बंध नसून त्यासाठी वाहतूक पास उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा यांच्याकडे उपलब्ध होतील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दुध, भाजीपला, औषधे, किराणामाल इ. वस्तू घरपोच करण्यात याव्यात. त्याचे नियोजन गावामध्ये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, सातारा यांनी आदेशाप्रमाणे स्वतंत्रपणे करावे व त्यावर तहसिलदार सातारा यांनी योग्य ते नियंत्रण करावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा.
या आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे तसेच ग्रामपंचायतीचे अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेले सर्व कर्मचारी व त्यांची वाहने तसेच शासकीय व अन्य अत्यावश्यक सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना या आदेशानुसार वगळण्यात येत आहे.