कृषी महाविद्यालयात नवीन कृषीपूरक प्रकल्पांचे उद्घाटन; विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा

प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यास प्रोत्साहन - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर


स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑगस्ट : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयात विविध कृषीपूरक प्रकल्पांचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळून ते भविष्यात स्वतःचे कृषी उद्योग उभारतील आणि परिसरातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाची कृषी उत्पादने मिळतील, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कृषी संजीवनी जैविक खते व कीडनाशके उत्पादन प्रकल्प, दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रकल्पाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक मार्गदर्शनच नव्हे, तर कौशल्य विकासाची संधी मिळेल. तसेच, परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पांमध्ये तयार होणाऱ्या निविष्ठांचा वापर करून आपल्या उत्पादनात भरघोस वाढ साधावी, असे आवाहनही त्यांनी केले.

या नूतन प्रकल्पांमधून विविध उत्पादने घेतली जाणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थी आणि शेतकरी दोघांनाही फायदा होणार आहे.

  • जैविक खते व कीडनाशके प्रकल्प: यामध्ये असिटोबॅक्टर, पीएसबी, केएसबी, रायझोबियम यांसारखी जैविक खते तसेच ट्रायकोडर्मा, मेटारायझियम, बव्हेरिया यांसारखी जैविक बुरशीनाशके व कीडनाशके तयार केली जातील.
  • दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प: यामध्ये श्रीखंड, पनीर, बासुंदी यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन घेतले जाईल.
  • काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रकल्प: यामध्ये फळांवर प्रक्रिया करून जाम, जेली, सिरप, स्क्वॉश, कँडी तसेच जांभूळ, चिक्कू, पेरू यांसारख्या फळांच्या पावडरी तयार केल्या जातील.

या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयीन समितीचे व्हाईस चेअरमन श्री. शरदराव रणवरे, गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्या सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, श्री. रणजित निंबाळकर, श्री. शिरीष दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, श्री. अरविंद निकम, श्री. सी. डी. पाटील, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांच्यासह प्रा. मनोज शहा, प्रा. सचिन बनकर, प्रा. माधुरी पवार, डॉ. मोहन बंडगर, प्रा. अभय शिंदे, डॉ. रणजित करचे, प्रा. सागर तरटे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!