स्थैर्य, फलटण : फलटणमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून आज संध्याकाळी उशीरा सहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील चार महिला, एक पुरुष व ग्रामीण भागातील एका पुरुषाचा समावेश आहे. बाधीतांची संख्या वाढल्याने शहरवासीयांच्या डोकेदुखीतही मोठी वाढ झाली आहे.
फलटण शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून फलटण शहरातील रविवार पेठ मधील ४ महिलांचे आणि सोमवार पेठेतील एक व्यक्ती व तालुक्यातील फडतरवाडी येथील एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहर धोक्याच्या उंबरट्यावर आले आहे.
फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील 45 वर्षीय एकाला सारीची लागण झालेली त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर फलटण शहरातील सोमवार पेठ येथील एका 35 वर्षीय व्यक्तीलाही सारीची लागण होऊन त्याचाही अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी रविवार पेठेतील सोलापूरहून आलेल्या 70 वर्षीय मयत वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता त्या मयत महिलेच्या संपर्कातील एका 3 वर्षीय बालकाचा अहवाल 3 दिवसांपूर्वी पॉसिटीव आला होता, आता त्या वृद्ध महिलेच्या संपर्कातील लो रिस्क म्हणून गणल्या गेलेल्या चार महिलांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ माजली आहे. शहरात यापूर्वी बरेच दिवस कोरोनाचा प्रवेश झाला नव्हता मात्र या महिन्यात शहरात आज अखेर एकूण 8 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आणि त्यातील 2 जणांचा मृत्यू झाल्याने शहर धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. रविवार पेठेतील मयत वृद्ध महिलेच्या संपर्कातील लो रिस्क म्हणून गणल्या गेलेल्या 42 जणांचे प्रशासन स्वाब घेण्याची शक्यता आहे.