दैनिक स्थैर्य । दि. २३ डिसेंबर २०२२ । सातारा । स्वतःची पारख स्वतः करा, आपली संस्कृती आणि सभ्यता या पासून दूर जाऊ नका, तुमची किंमत किती, ही तीच व्यक्ती करते की जिला माणसाची पारख करता येते. आपल्याला स्वतःचे भविष्य स्वतः घडवायचे आहे. ‘हे मला जमणार नाही’ असे कदापि म्हणू नका. क्रिकेटमध्ये येणारा प्रत्येक बॉल आपल्याकडे येतो,तशा संधी जीवनात येत असतात,त्यामुळे एखादी संधी चुकली म्हणून त्यामुळे खचून जाऊ नका. मैदानावरून पळून जाऊ नका.एक संधी निघून गेली म्हणजे सारे काही संपले असे नसते. एखादी इच्छा म्हणजे सर्वस्व नव्हे. एडिसनला त्याच्या शाळेतील शिक्षकांनी तुमचा मुलगा बुद्धू आहे असे म्हणून शाळेत कमी लेखले पण त्याच्या आईने त्याचे गुण ओळखून त्याला त्याचा आत्मविश्वास दिला. त्यामुळे त्याने अनेक शोध लावले.एखादी चूक झाली तरी सुधारता येते.आयते मिळते ते तात्पुरते असते.शॉर्टकट हा एक सापळा असतो, तुम्ही तुमच्या क्षमता वापरल्या नाहीत तर तुम्ही नाहीसे होत जाता. म्हणून स्वतःचा आत्मविश्वास कमी करू नका.कोणतेही काम करायला नाही म्हणू नका. वकिलीसारखा व्यवसाय नाही. सचोटीने अभ्यास करायला हवा.मुलीनी तर कधीच खचून जाऊ नये. तुम्ही पुरुषांच्या पुढे निघून जाल. प्रामाणिकपणा,सभ्यपणा व स्वाभिमान कधीही सोडू नका’असे विचार सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश मा.दिलीप भोसले यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेने इस्माईलसाहेब मुल्ला यांच्या ४९ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला त्यावेळी सातारा येथे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील होते.संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे,अॅड.दिलावर मुल्ला, इस्माईलसाहेब मुल्ला यांचे कुटुंबीय, नातेवाईक, प्राचार्य आर.डी.गायकवाड, प्राचार्य आर.के.शिंदे, डॉ.मोहन पाटील, प्राचार्य डॉ.अशोक भोईटे, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती. तसेच इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
इस्माईलसाहेब मुल्ला यांच्याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की,’’इस्माईलमुल्लाचे व्यक्तिमत्व मी बघितले होते. ते थोर व्यक्ती होते.माझे वडील बाबासाहेब भोसले यांना लंडनहून आल्यानंतर पक्षकारांची फी त्यांनी दिली होती.एवढा त्याग पहायला मिळत नाही. अण्णांनी त्यांना ओळखले होते. कर्मवीर कुटुंबियांच्याबद्दल त्यांच्या मनात खूप आदर होता. इस्माईलसाहेबांच्या डिक्शनरीत एकच शब्द होता तो म्हणजे त्याग. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. रयत शिक्षण संस्था नसती तर शिवाजीराव,बाबासाहेब,दिलीप भोसले झाले नसते. रयत शिक्षण संस्था कर्मवीर यांच्यामुळेच मी जज झालो. कर्मवीरांचे अनंत उपकार आपल्या सर्वावर आहेत असेही ते म्हणाले. इस्माईलमुल्लांची पणती आप्पासाहेब इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी, सारा जहीरअब्बास मुल्ला हिचे इंग्रजीत भाषण ऐकून ती चांगली वकील होईल,अधिकारी होईल,जिथे जाईल तिथे नाव कमावेल असे सांगून तिचे कौतुक केले. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या कामात मी सदैव तयार असेन असे ते म्हणाले. पुरस्काराची रक्कम गरजू विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली.संस्थेने जो मानसन्मान केला तो कधीच विसरू शकणार नाही असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील म्हणाले की’ अण्णा आणि इस्माईलसाहेब यांचा ऋणानुबंध होता.संस्थेच्या बोर्डिंगचे ते पहिले विद्यार्थी होते.७ वीला मुंबई इलाख्यात १० जिल्ह्यात ते पहिले आले होते. ते पुण्याला बी.ए.शिक्षणास गेले.पुढे एम.ए.ला असताना त्यांच्या आईंचा मृत्यू झाला. अण्णांनी त्यांना वकिलीचे शिक्षण घेण्यास पाठवले.वकील झाल्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची पहिली केस जिंकली.गृहमंत्र्याच्या विरोधात केस करण्याचे धैर्य त्यांच्यात होते. रयत शिक्षण संस्थेचे ते मानद सचिव होते. संस्थेचा साधा चहा कधी त्यांनी घेतला नाही. दिलावरवर जेवढे प्रेम केले नाही तेवढे आमच्यावर केले.आम्हा भावंडाना त्यांनी तीन घड्याळे दिली.रयत शिक्षण संस्थेत सचिव असताना त्यांनी स्वतःच्या मुलीसाठी ऑर्डर काढली नाही.त्यांचा त्याग मोठा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. इस्माईलसाहेब मुल्ला यांचे चिरंजीव अॅड. दिलावरसाहेब मुल्ला यांनी इस्माईलसाहेब यांच्या आठवणी सांगितल्या.इस्माईलसाहेब मुल्ला यांना ऐहिक सुख कोणतेही मिळाले नाही पण त्यांची कसलीही खंत न बाळगता त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी जीवन समर्पित केले असे त्यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे व्हॉईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे म्हणाले की इस्माईल मुल्ला यांचा समिधा ग्रंथ मी अनेकदा वाचला. त्या ग्रंथातल्या आठवणी वाचल्या की डोळे भरून येतात आणि गहिवरून येते. आज संस्थेच्या कार्यालयात १५० लोक काम करतात. तेंव्हा ते संस्थेचा सर्व पत्रव्यवहार पहात असत. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील वहिनी यांच्यानंतर जर सर्वात मोठा त्याग कोणी केला असेल तर तो इस्माईल साहेब मुल्ला यांचाच आहे असे ते म्हणाले. मानपत्र वाचन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. डॉ.अनिल पाटील यांचे हस्ते दिलीप भोसले यांना सन्मानचिन्ह,मानपत्र व रुपये पंचवीस हजार देऊन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. आभार प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा पाटील यांनी मानले. सूत्र संचालन प्रा.डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले. प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव,प्राचार्य डॉ.बाळ कांबळे,प्राचार्य डॉ.आतार,रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव राजेंद्र साळुंखे हे उपस्थित होते. साताऱ्यातील रयतच्या विविध शाखातील रयतसेवक यावेळी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.