‘तुमच्यासारख्या सत्तेसाठी भुकेल्या हुकूमशहापुढे कधीही झुकणार नाही’ – प्रियंका गांधी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ मार्च २०२३ । मुंबई । काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात गुरुवारी सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज(शुक्रवार) त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या कारवाईनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘तुम्ही संसदेत नेहरू आडनावाचा उल्लेख केला होता, त्यावरुन कोणत्याही न्यायाधीशाने तुम्हाला दोन वर्षांची शिक्षा दिली नाही’, असं प्रियांका म्हणाल्या.

एकामागून एक चार ट्विट करत प्रियंका गांधींनी आपला संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘नरेंद्र मोदीजी तुमच्या चमचांनी एका शहीद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर म्हटले. तुमच्याच एका मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधीचे वडील कोण? असा सवाल केला होता. कश्मीरी पंडितांच्या परंपरेनुसार, एक मुलगा वडिलांच्या मृत्यूनंतर डोक्यावर पगडी घालतो.’

‘तुम्ही संसदेसमोर आमचे कुटुंब आणि कश्मीरी पंडितांचा अपमान केला आणि नेहरू आडनाव का लावत नाही, असा सवाल विचारला. पण, तुम्हाला तर कोणत्याही न्यायाधीशाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली नाही. तुम्हाला संसदेतून अपात्रही ठरवले नाही. एक सच्चा देशभक्त म्हणून राहुलने गौतम अदानी, नीरव मोदी आणि मेहूल चौकसीच्या लुटीवर प्रश्न विचारला होता.’

‘तुमचा मित्र गौतम अदानी भारताची संसद आणि भारतातील जनतेपेक्षा मोठा झालाय का? त्यांच्या लुटीवर प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला इतका त्रास का झाला? तुम्ही आम्हाला घराणेशाही म्हणता. पण, याच कुटुंबाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी रक्त वाहिले आहे. याच कुटुंबाने भारतातील जनतेचा आवाज मजबुत केलाय आणि सत्याची लढाई लढली आहे. आमच्या अंगात जे रक्त वाहत आहे, ते तुमच्यासारख्या भ्याड, सत्तेसठी भुकेल्या हुकूमशहापुढे कधीही झुकणार नाही. तुम्हाला जे पाहिजे ते करा,’ अशी टीका प्रियंका यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!