दैनिक स्थैर्य | दि. 10 ऑगस्ट 2024 | फलटण | ‘‘मिलींद नेवसे हे फलटणकरांचे आवडते व्यक्तीमत्त्व असून राजेगटाचे सच्चे निष्ठावंत सैनिक म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत. मिलींद नेवसे यांचेकडे फलटण नगरपालिकेच्या अखत्यारित असलेले कोणतेही काम घेवून गेले तरी ते खात्रिशीर झटपट होते अशी फलटणकरांची भावना आहे. यामुळेच नेवसे परिवाराला लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. सत्ता असो वा नसो सामाजिक बांधिलकी सदैव जपणारे असे मिलींद नेवसे कुटूंबिय आहे’’, असे गौरवोद्गार माजी पशुप्रांत डॉ.श्रीकांत मोहिते यांनी काढले.
क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलींद (आप्पा) नेवसे यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात संपन्न झाला. वाढदिवसानिमित्त मिलींद नेवसे यांचा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विशेष सन्मान होऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्याप्रसंगी डॉ.श्रीकांत मोहिते बोलत होते.
डॉ.श्रीकांत मोहिते पुढे म्हणाले, ‘‘मिलींद नेवसे आणि माझे बालपणापासूनचे जवळचे संबंध आहेत. शालेय जीवनात इ.5 वी इ. 10 वी पर्यंत कायमस्वरुपी प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण होत असत. पहिल्यापासूनच शांत स्वभाव आणि प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची वृत्ती असल्याने पुणे येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना देखील त्यांनी आपल्या अनेक मित्रांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली होती.’’
‘‘सन 1979 साली आमची यशवंतराव चव्हाण हायस्कूलमधील इ.10 वीची बॅच होती. आजमितीसही या बॅचमधील मित्रपरिवार संघटित ठेवण्याचे काम मिलींद नेवसे यांनी केले असून या ‘वाय.सी.79’ ग्रुपच्यावतीने लवकरच वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा मिलींद नेवसे व मनोहर गायकवाड यांच्या संयुक्तीक खर्चाने वाढदिवस साजरा होत असतो. यातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळून त्यातून प्रत्येकालाच उत्साह मिळतो’’, असेही डॉ.श्रीकांत मोहिते यांनी यावेळी आवर्जून सांगितले.