दैनिक स्थैर्य । दि.२८ मार्च २०२२ । मुंबई । आजचे युग हे तंत्रज्ञानाचे व संगणकाचे युग आहे. आपले वैयक्तिक व सामाजिक आयुष्य या तंत्रज्ञानाशी जोडले गेले असल्यामुळे त्याचे चांगले वाईट परिणाम अनुभवत असतो. सायबर विश्वात वावरताना कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता नेटवर्किंग साईट्सचा विचारपूर्वक वापर करावा तसेच आपली गोपनीय व खाजगी माहिती विनाकारण कुणालाही देऊ नये. माहितीचे आदान प्रदान करताना सर्वांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आर्थिक गुन्हे शाखेचे अपर पोलीस महासंचालक मधुकर पांडे यांनी केले.
महाराष्ट्र सायबर विभाग आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम यांचा समावेश असलेल्या मेटा प्लॅटफॉर्म यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल, तेलुगू चित्रपटसृष्टीत अभिनेत्री ऐश्वर्या राज भाकुनी, पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, मेटातर्फे सेफ्टी मॅनेजर विजय पमार्थी, अंशुमन मेनकर, तसेच इंडिया फ्युचर फाऊंडेशनचे कनिष्क गौर, अमित दुबे, जी डी सोमाणी व कॅम्पीयन विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
सोशल मीडियाचा वापर करताना विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिंनींनी काळजी घ्यावी. खासगी माहिती, फोटो शेअर करताना विशेष काळजी घ्यावी; तसेच सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवू नये, इ मेल किंवा मेसेजद्वारे येणारे प्रलोभने याला बळी न पडता त्याची पूर्ण शहानिशा करावी, ब्लु लिंक ओपन करू नये असे आवाहन श्री. पांडे यांनी केले.
सोशल मीडियावर विविध प्रलोभने देऊन लिंक पाठविल्या जातात त्या लिंक ओपन करू नये. तसेच आपल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, क्रेडीट कार्ड, यांचे पासवर्ड नियमित बदलत राहणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींशी संपर्क वाढवू नये तसेच सोशल मीडियावर अनेक संकेतस्थळ आहेत त्याला भेट देऊ नये, तसेच कुठल्याही माहितीची शहानिशा केल्याशिवाय अधिकची माहिती न घेता पुढे पाठवू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विद्यार्थिनींबरोबर संवाद साधून सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
शालेय विद्यार्थ्यांनी आज सायबर बुलिंग, सायबर सेक्सटोर्शन, ट्रोलिंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, चाईल्ड पोर्नोग्राफी, डार्कनेट गुन्हे, हॅकिंग, ओळख चोरी, गोपनियतेचा भंग इत्यादीसारख्या इंटरनेटवरील धोक्यांची जाणीव यावेळी श्री. यादव यांनी करून दिली.
श्री. यादव म्हणाले की, आज जगात सायबर क्राईम हा एक संघटित, मोठी उलाढाल असलेले गुन्ह्याचे क्षेत्र म्हणून उदयास आले आहे. अशा वातावरणात इंटरनेटवरील मुलांची सुरक्षा ही संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांनी दखल घेतलेली जागतिक समस्या बनली आहे.
चांगल्या सायबर स्वच्छ वर्तनासह या पिढीला सायबर जबाबदार नागरिक बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सायबरने राज्यातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रम देण्यासाठी मेटा प्लॅटफॉर्म आणि इंडिया फ्यूचर फाऊंडेशन यांचेसोबत भागीदारी केली आहे. यातुन सायबर बुलींग, लैंगिक शोषण इत्यादीसारख्या सायबर क्राईम्सच्या आघात आणि विध्वंसक परिणामांपासून विद्यार्थी सुरक्षित रहावेत असा प्रयत्न राहील, असे श्री. यादव यांनी सांगितले.
महाराष्ट्र सायबर ही सायबर क्राईम आणि सायबरसिक्युरिटीसाठीची महाराष्ट्र राज्याची नोडल एजन्सी आहे. सायबर क्राईम तपास प्रयोगशाळा, सायबर पोलीस स्टेशन्स तयार करण्यात आणि महाराष्ट्रातील पोलीस आणि नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल आवश्यक सर्व जागरुकता निर्माण करण्यात महाराष्ट्र सायबर प्रयत्नरत आहे,असेही श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.
चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल, हिंदी टेलिव्हिजन आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ऐश्वर्या राज भाकुनी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कशी फसवणूक केली जाते याविषयी त्यांचे अनुभव सांगितले.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना श्री पांडे अणि श्री यादव यांनी उत्तरे दिली. सुरुवातीला सायबर विभागाने तयार केलेली चित्रफीत दाखवण्यात आली.