स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 12 : भारताच्या सीमेवर नेपाळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. भारत-नेपाळ सीमेवर सीतामढी जिल्ह्यात ही घटना घडली. पीटीआय आणि एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही स्थानिक भारतीय भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना पाहून नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाने गोळीबार केला. यात एक जण ठार तर दोन जखमी झाले आहेत.
पण हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत स्पष्टता नाही.
नेपाळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, भारतीय नागरिकांनी त्यांच्याकडून शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 5 भारतीयांवर गोळी झाडली. त्यात एकाचा मृत्यू झाला. विकेश उर्फ विकास असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. तर एक जखमी भारतीय नागरिक नेपाळ पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
सदर व्यक्ती तस्करी करणारे लोक असून ते सुरुवातीला छोट्या संख्येने येतात. पण नंतर ते प्रचंड मोठ्या संख्येने येतात, असं नेपाळच्या सापतारी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहन बहादूर बी. सी. यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी बिहार पोलीस लवकरच एक पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सीमा सुरक्षा दलाचे डीजी कुमार राजेश चंद्र यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी एक कुटुंब नेपाळमध्ये जात होते. त्यांना नेपाळी संरक्षण दलाने थांबवले व माघारी जाण्यास सांगितले. वादावादी जाल्यानंतर नेपाळकडून गोळीबार करण्यात आला त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
https://twitter.com/ANI/status/1271345289635364864