दैनिक स्थैर्य । दि. 01 ऑक्टोबर 2021 । फलटण । साखरवाडी (ता. फलटण) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिकेत उघडे पाटील व आरोग्य सेविका शिर्के यांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला असून या गलथान कारभाराचा फटका गरोदर महिला व त्यांच्या कुटूंबियांना भोगावा लागत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, साखवाडी (ता.फलटण) गावातीलच प्राची सागर जावळे या गरोदर महिलेला पहाटे घरी त्रास व्हायला लागल्याने कुटूंबिय तिला घेऊन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. सुमारे एक तास दरवाजा ठोठावूनसुद्धा कोणीही दरवाजा उघडला नाही. नंतर दरवाजा उघडल्यावर शिर्के नामक आरोग्यसेविकेने, ‘‘तुम्हाला सांगितलं ना, तुमच्या पेशंटची इथे प्रसूती होणार नाही. तुम्ही तरी इथे कशाला आला?’’ असे म्हणून सदर महिलेस दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र महिलेला जास्त त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी इथेच प्रसूती करा म्हणून विनवणी केली. प्रसूतीनंतर महिलेला सुमारे 20/25 टाके टाकले असल्याचे नातलग सांगत आहेत. त्यानंतर रात्री 9 वाजता वैद्यकीय अधिकारी यांनी कुटुंबियांना बोलावून, ‘’तुमचा पेशंट सिरीयस असून पुढील उपचारासाठी तुम्ही फलटणला जा इथे उपचार होणार नाहीत’’, असे म्हणून पेशंटला बळजबरीने बाहेर काढले. दरम्यान, प्रसूतीसाठी वैद्यकीय अधिकारी अनिकेत उघडे पाटील यांनी पैसे मागितल्याचा सुद्धा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. संबंधित महिला आता खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून महिलेला उपचारासाठी 70 ते 80 हजार खर्च सांगितला असून सदर खर्च कोणी करायचा? हा प्रश्न गरीब कुटुंबापुढे पडला असून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महिलेचे कुटुंबीय करत आहे.