दैनिक स्थैर्य | दि. ९ जुलै २०२३ | फलटण |
नीरा उजवा कालव्याचे सिमेंट काँक्रिटचे होणारे अस्तरीकरण थांबविण्याबाबत नीरा उजवा कालवा बचाव समिती फलटण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार अभिजित पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.
या निवेदनात बचाव समितीने म्हटले आहे की, नीरा उजवा कालवा हा ब्रिटीशकालीन १०० वर्षापूर्वीचा बागायती परिसर आहे. सदर परिसरातील बहुतांश (७०%) शेतजमीन ही वर्षानुवर्ष महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ यांच्याकडे होती. शेती महामंडळ यांच्याकडे सदर जमीन असल्यामुळे या परिसरात विहीर, कूपनलिका, पाईपलाईन याची कुठलीही सुविधा नव्हती; परंतु मागील १० वर्षापूर्वी शेती महामंडळाकडील जमीन खंडकरी शेतकर्यांना परत करण्यात आली. त्यानंतर शेतकरी बांधवांनी आपल्या शेती महामंडळाकडून सुटलेल्या जमिनीमध्ये आधुनिक शेती करण्यासाठी विहीर, कूपनलिका यामाध्यमातून लाखो रुपयांचे कर्ज काढून पाण्याचे स्त्रोत निर्माण केले आहेत. त्याचबरोबर नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेरील शेतकरी बांधवांनी २५ वर्षांपासून नीरा-देवघरच्या कालव्याची वाट पाहून नीरा उजवा कालव्याच्या लगतच्या परिसरामध्ये विहिरी खोदून १० ते १२ किलोमीटरपर्यंत लाखो रुपयांचे कर्ज काढून शेतकर्यांनी लिफ्ट इरिगेशन केले आहे. फलटण तालुक्यातील पाडेगावपासून ते राजाळेपर्यंत या ३६ गावांतील अनेक पिण्याच्या पाण्याच्या ग्रामपंचायतीच्या योजना या विहिरीद्वारे असून या परिसरातील संपूर्ण नागरीकीकरणाला व वरील शेतजमिनींना नीरा उजवा कालव्याच्या होऊ घातलेल्या अस्तरीकरणमुळे विहिरी, कूपनलिका कोरड्या पडणार असून शेतजमिनीची व नागरिकीकरणाची भीषण पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे या परिसरातील दूध व्यवसाय तसेच ऊस शेती धोक्यात येवून तालुक्यातील चार साखर कारखानेही अडचणीत येणार आहेत. पर्यायाने या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत.
नीरा उजवा कालव्यापासून १०० मीटरच्या अंतरावर फलटण तालुक्यातील पाडेगावपासून राजुरीपर्यंत अनेक गावे नागरीकीकरणाने वसलेली आहेत. या परिसरातील वरील पाण्याचे स्त्रोत अस्तरीकरणामुळे बंद पडणार असून त्यामुळे कालव्याच्या लगत असणारे नागरिकीकरण यांना पाण्यासाठी कुठलाही पर्याय नसल्याने या कालव्यावरून भविष्यात पाण्याची उपलब्धता करत असताना माता-भगिनी, लहान मुले, जनावरे कालवा सिमेंट काँक्रीटीकरणामुळे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होणार आहे.
या सर्व कारणांमुळे फलटण तालुक्यातील अनेक गावांचा नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला विरोध आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने नेहमीच्या दुरूस्तीप्रमाणे दुतर्फा घाट आणि इतर डागडुजी या दुरूस्तीला कोणाचाही विरोध नाही. त्यामुळे आपण या संपूर्ण कामावर कायमस्वरूपी स्थगिती आणून आम्हा सर्वसामान्य शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थांच्या शेतकरी हिताचा निर्णय घेवून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील ३६ गावांतील शेतकरी, शेतमजूर, नागरिक यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार अभिजित पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
अस्तरीकरण थांबविण्यासाठी नीरा उजवा कालवा फलटण तालुका लाभक्षेत्रातील ३६ गावांतील शेतकरी, शेतमजूर, नागरिक यांनी आपापल्या गावच्या ग्रामसभेत अस्तरीकरणाविरोधात ठराव मांडून ते संमत केले आहेत. या ३६ गावांतील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांकडून नीरा उजवा कालवा बचाव समिती अस्तरीकरणाविरोधात लढा देत आहे.