दैनिक स्थर्य । दि. 19 ऑक्टोंबर 2022 । फलटण । माजी खासदार स्व. हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे स्वप्न असलेला नीरा देवघर प्रकल्पास राज्य व केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या रखडलेल्या मान्यतांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वत:चे मंत्रीपद अबाधित राहून सत्तेत राहण्यासाठी नीरा देवघर प्रकल्प रखडवला असल्याची टीका माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार रणजितसिंह म्हणाले, शरद पवार व अजित पवार यांनी फलटण, माळशिरस या दुष्काळी तालुक्यातील जनतेचे पिण्याचे पाणी बारामतीच्या औद्योगिक वसाहतीसाठी वळवले. त्यावेळी फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना सत्तेत घेत मंत्रीपद दिले व शांत केले. रामराजे नाईक निंबाळकर हे जलसंपदा मंत्री होते. त्यांनी ठरवले असते तर नीरा देवघर प्रकल्प केव्हाच पूर्णत्वास गेला असता, परंतु त्यांनीसुद्धा मंत्रीपदासाठी फलटणकरांच्या हक्काचे पाणी बारामतीला दिले. तत्कालीन राज्य सरकारमधील अधिकार्यांवर शरद पवार व अजित पवार यांनी दबाव टाकून खोटे अहवाल केंद्र सरकारकडे सादर केले. यामुळे नीरा देवघर प्रकल्प रखडला होता.
खोटे अहवाल तयार करण्यामध्ये जे अधिकारी, मंत्री व आमदार सहभागी होते त्यांची एसआयटी मार्फत चौकशीसाठी आपण मागणी करणार आहोत. जलसंपदा विभागातील अधिकार्यांवर दबाव टाकून खोटे अहवाल सादर केल्यामुळे फलटण, माळशिरस यासह नीरा देवघरच्या लाभक्षेत्रातील सर्वच गावे पाण्यापासून वंचित राहिली. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील जनतेशी गद्दारी करत दुष्काळी भागातील पाणी बारामतीच्या औद्योगिक वसाहतीसाठी वळवले असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालयामार्फत नीरा देवघर प्रकल्पासाठी एक गोपनीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये तत्कालीन सत्ताधारी मंडळींनी दिलेल्या चुकीच्या अहवालाची पोलखोल झाली. यामुळे नीरा देवघर प्रकल्पासाठी ज्या मान्यता प्रलंबित होत्या. त्या सर्व मान्यतांना नव्याने मंजुरी देण्यात आली आहे. नीरा देवघर प्रकल्पातून अतिरिक्त शिल्लक राहणारे पाणी धोम बलकवडीच्या कॅनॉलमधून वितरित करण्यात येणार आहे. यामुळे धोम बलकवडीचा कॅनॉलसुद्धा बारमाही चालेल, असेही खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.
देशामध्ये सध्या गंगा नदीवर नदीजोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. यानंतर देशामध्ये दुसरा प्रकल्प म्हणून कृष्णा-भीमा स्थैर्यीकरण प्रकल्प हाती घ्यावा यासाठी आपण पाठपुरावा करत असून केंद्र सरकार कृष्णा भीमा स्थैर्यीकरणासाठी नक्कीच मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देणार आहेत. कृष्णा भीमा स्थैर्यीकरणामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी गावांचा कायमस्वरुपी दुष्काळ संपणार आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व संबंधित खात्यांकडे नीरा देवघर प्रकल्पासाठी केलेल्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.