सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज : दादासाहेब भोसले; कोळकीत जयंती उत्साहात साजरी


स्थैर्य, कोळकी, दि. २९ मार्च : चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यासारखा शौर्यवान आणि लोककल्याणकारी राजा इतिहासात झाला नाही. त्यांचे महान आदर्श अंगीकारून समाजातील मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक दादासाहेब भोसले यांनी केले.

कोळकी (ता. फलटण) येथील फुले-शाहू-आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने सम्राट अशोक यांची २३३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘BSI मिशन २५’ अंतर्गत दिलेली उद्दिष्टे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहनही भोसले यांनी यावेळी केले.

याप्रसंगी सोमीनाथ घोरपडे, माजी अध्यक्ष शिवाजी सावंत, साहित्यिक भीमराव लोंढे, अशोक भोसले (वंचित बहुजन आघाडी), रंजना रणवरे आणि सुजाता गायकवाड यांनीही आपापल्या भाषणातून सम्राट अशोकांच्या लोककल्याणकारी धोरणांवर व धम्मकार्यावर प्रकाश टाकला. तसेच, जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते यांनी आगामी काळात ही जयंती अधिक व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण गायकवाड यांनी केले. तर, मोगराळे येथील उपासक आबा भोसले यांनी उपस्थितांना गोड जिलेबीचे वाटप केले. या प्रसंगी चित्राताई गायकवाड, अश्विनी अहिवळे, कांताताई काकडे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!