दैनिक स्थैर्य । दि. २५ जुन २०२१ । सिंधुदुर्गनगरी । नैसर्गिक संकटाचे विपरित परिणाम कमी करण्याच्यादृष्टीने राज्यातील किनारपट्टी जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कोविड काळात उभारलेल्या तात्पुरत्या आणि इतर रुग्णालयातील वीज पुरवठा सुरळित राखणे, ऑक्सीजन टँकची सुरक्षितता तपासणे. ऑक्सीजनचा पुरेसा साठा करून ठेऊन पुराचे पाणी रुग्णालयात शिरू न देणे यादृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, सभापती अनुश्री कांबळी, यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह इतर मान्यवर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन झाले तेव्हा राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव नव्हता. परंतू आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पूर्णत्वाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षीपासून आपल्यासमोर नैसर्गिक संकटांचे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. अतिवृष्टी आणि वादळाला राज्य सामोरे गेले. या नैसर्गिक संकटात प्राणहानी होऊच नये आणि मालमत्तेचीही हानी टाळता यावी यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे झाले आहे. किनारपट्टी जिल्ह्यात हजारो लोकांना कोविड नियमांचे पालन करत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. ही सगळी परिस्थिती सिंधुदूर्गसह किनारपट्टी जिल्ह्यांनी यशस्वीरित्या हाताळली आणि या आव्हानांचा कुशलतेने सामना केला. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंत्रणेवर जसा ताण आहे तसाच तो यंत्रांवरही आहे, ही यंत्रे ही चोवीस तास सुरु आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुर्देवी घटनाही घडल्या, त्या टाळण्यासाठी विद्युत वायरिंग तपासून घेणे, रुग्णालयांचे फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. या काळात मोठ्याप्रमाणात झाडं उन्मळून पडतात ती वीज तारांवर पडून वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
आपण कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामाना केला. दुसरी लाट अजून ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, नवीन विषाणूचा शिरकाव झालेला दिसून येत आहे. आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ केली आहे, भविष्यात ही ती करू. पण याक्षेत्रातील तज्ज्ञांची उपलब्धता वाढवण्याला मर्यादा आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे म्हणजे, मास्क व्यवस्थित लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात धुणे या त्रिसुत्रीचे, कटाक्षाने पालन करावे असे आवाहन ही यावेळी केले.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य – राजेश टोपे
जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ होत असल्याचा आनंद आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केला. आरोग्य हा विषय मुख्यमंत्र्यांच्या हृदयाच्या जवळचा विषय असल्याने अनेक गोष्टी त्यांच्या नेतृत्वात मार्गी लागत आहेत. अनेक चांगल्या कामांना गती मिळत असल्याचे श्री. टोपे म्हणाले. उपजिल्हा रुग्णालय सुरु होतांना जिल्ह्यातील तज्ज्ञांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयाला आवश्यक असलेल्या सगळ्या बाबींसाठी सहकार्य करू, रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाहीही श्री. टोपे यांनी यावेळी दिली. 100 खाटाच्या निर्मितीच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न राहील. पूर्वी चक्राकार पद्धतीने 80 टक्के नियुक्त्या या विदर्भात व्हायच्या. आता हा निर्णय बदलण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा कोकणवासियांना लाभ होईल, असे सांगून त्यांनी नैसर्गिकदृष्ट्या सुंदर कोकणाला मदत करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचेही स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न – उदय सामंत
आपले मूळ गाव वेंगुर्ला आहे, वेंगुर्ल्याच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती करणारा आजचा दिवस आहे. त्यामुळे आपल्याला विशेष आनंद झाला असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी म्हटले. कोविडच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात ऑक्सीजनसह इतर आरोग्य सुविधा मोठ्याप्रमाणात उभ्या करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. तसेच वेंगुर्ला येथील ब्रिटीशकालीन सेंट ल्युक रुग्णालय शासनाने ताब्यात घेऊन पुन्हा सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी सुरु व्हावे – खासदार विनायक राऊत
अपुऱ्या कर्मचारीबळावर कोणतेही कारण न देता जिल्ह्याचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत असल्याचे सांगतांना जिल्ह्याला आणखी तज्ज्ञ डॉक्टर मिळावेत अशी मागणी खासदार राऊत यांनी केली. तसेच नवीन शासकीय महाविद्यालय यावर्षी सुरु व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उर्वरित तीन रुग्णालयांचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन काम मार्गी लावावे अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी केली. त्यांनी माकडताप आणि लॅप्टोस्पायरसीसची जिल्ह्यात मोठी लागण होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विषाणू चाचणी प्रयोगशाळा आता सुरु झाली आहे, अशी माहिती दिली. शासकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना आणखी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. श्री.केसरकर यांनी कोकणचे तीन भागात विभाजन व्हावे आणि कोकणाच्या तिसऱ्या विभागात सिंधुदूर्ग- रत्नागिरीचा समावेश करावा जेणेकरून रुग्णालयासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल, अशी विनंतीही यावेळी केली.
जिल्हाधिकारी श्रीमती मंजुलक्ष्मी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणि कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. तर वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक अतुल मुळे यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेविका श्रेया मयेकर, नगरसेवक धर्मराज कांबळी आदी उपस्थित होते.
लोकार्पण कार्यक्रमानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रुग्णालयाचे कंत्राटदार ए.एस.जुवेकर, वैद्यकीय अधीक्षक श्री. मुळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचेही पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.