संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याची गरज – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० मार्च २०२३ । पुणे । शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शोधकवृत्ती निर्माण होते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनाद्वारे स्वावलंबी करण्यासाठी  प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या बोऱ्हाडेवाडी येथे महिलांसाठी असलेल्या मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसीच्या वसतिगृह आणि महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह सुरेश तोडकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, सचिव डॉ. निवेदिता एकबोटे, प्राचार्य शशिकांत ढोले, माजी महापौर राहुल जाधव आदी उपस्थित होते

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आज संपूर्ण जग आपल्या देशात होणाऱ्या वेगवेगवेगळ्या संशोधनाकडे लक्ष ठेवून आहे. गेल्या दोन वर्षात देशात  संरक्षण क्षेत्रातील उत्पादन वाढले  आहे. कारण आपण त्याप्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील  उत्पादनावर होणारा खर्च टाळण्यासाठी या क्षेत्राशी संबंधित संशोधनावर भर देण्याची गरज आहे. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी अशा  शैक्षणिक सुविधा निर्माण करून त्यांच्यात संशोधनवृत्ती निर्माण करावी. या संशोधनामुळे देश समृद्ध होण्यास मदत होईल.

नवीन शैक्षणिक धोरणात अधिकाधिक महिलांना शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचादृष्टीने महिला शिक्षणाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थीनीच्या जीवनात वसतिगृहाचे महत्वपूर्ण स्थान आहे. मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने  ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय होण्यासाठी अतिशय उत्तम दर्जाच्या वसतिगृहाची उभारणी केली आहे. येथील विद्यार्थीनी शैक्षणिक जीवनात  वसतिगृह जीवनाचासुद्धा आनंद घेतील. येत्या काळात येथे लवकरच ‘फार्माडी’ अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात येईल.

नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके मराठीत करण्यात येणार आहे. इंग्रजी विषयाचे ज्ञान रूपांतरित स्वरूपात मराठीत मिळण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती श्री.पाटील यांनी दिली.

आमदार लांडगे म्हणाले, मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम येथे राबविण्यात येत आहेत. या संस्थेत शिक्षण घेऊन चांगले विद्यार्थी घडावे, त्यांचे आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी संस्था कार्य करीत आहे.

कार्याध्यक्ष डॉ. एकबोटे म्हणाले, महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाची 2004 साली स्थापना करण्यात आली. महाविद्यालयात राज्यासोबतच परराज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज 5 मजली वसतिगृहाचे उद्धाटन करण्यात आले असून यामध्ये प्रत्येक मजल्यावर 38 खोल्या आहेत. या ठिकाणी संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक शिक्षण देण्यावर नेहमी भर देण्यात येत आहे.

सहकार्यवाह डॉ. एकबोटे यांनी प्रास्ताविक केले.


Back to top button
Don`t copy text!