दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । फलटण । आपल्या देशामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांना मुलभूत शिक्षण हे त्यांच्या गावीच मिळणे गरजेचे आहे, असे मत हैद्राबाद येथील जेष्ठ साहित्यिका श्रीमंत इंदिराराजे गिरजी यांनी यावेळी व्यक्त केले.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या “जय – व्हीला” या निवासस्थानी हैद्राबाद येथील जेष्ठ साहित्यिका श्रीमंत इंदिराराजे गिरजी बोलत होत्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या देशाचा इतिहास व ग्रामीण भागातील संस्कृतीचे जतन करून ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील संस्कृतीचे जतन करून ती पुढील पिढीपर्यंत शिक्षणाद्वारे आपण सर्वजण पोचवू शकतो. शिक्षण हा एक सर्वात महत्वाचा घटक असून त्यासाठी सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी स्मारक किंवा इतर गोष्टी न बांधता त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रसार कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे, असेही मत यावेळी श्रीमंत इंदिराराजे गिरजी यांनी व्यक्त केले.
फलटणच्या राजे कुटुंबीयांचा व गिरजी कुटुंबियांचा जुना स्नेह व रूणानुबंध आहेत. फलटण येथील नागरिकही अत्यंत प्रेमळ व लाघवी आहेत. फलटण शहरासह तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातही शैक्षणिक संस्थेच्या द्वारे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत शिक्षण मिळत आहे. हे बघून अत्यंत समाधान वाटत आहे. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये जर शिक्षणासाठी कोणती ही गरज लागली तर ती गिरीजी कुटुंबीयांच्या मार्फत करण्यात येईल असेही यावेळी, श्रीमंत इंदिराराजे गिरजी यांनी स्पष्ट केले.
माणसांनी फक्त पैशाच्या मागे न लागता सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. फक्त पैसे पैसे पैसे न करता शिक्षणिक गरजा ह्या पूर्ण करणे व ज्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सुद्धा महत्त्वाचे व मोठे कार्य आहे, असेही यावेळी श्रीमंत इंदिरा राजे गिरजी यांनी स्पष्ट केले.
आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत धनराज गिरजी यांच्या नावाने शाळा सुरू करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे. फलटणचे व गिरजी कुटुंबीयांचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत ते अजून दृढ करण्यासाठी फलटण तालुक्यामध्ये गिरजी कुटुंबीयांच्या नावाने शाळा सुरू करून त्यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्यासाठी आपण कार्यरत राहू, असे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.