उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमांची गरज – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर


दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२२ । मुंबई । जर्मनीसह विविध देशातील उद्योगसमूह महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत. या उद्योगांना लागणारी कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीचे अभ्यासक्रम शिक्षणक्रमात आवश्यक आहेत. आगामी काळातील ही गरज ओळखून शालेय शिक्षण विभागाने त्या दृष्टीने पावले उचलावीत, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

जर्मनीचे वाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी आज मंत्रालयात मंत्री श्री. केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली. शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी श्री. फॅबिग यांच्याकडून जर्मनीतील शिक्षण पद्धती, तेथील विविध उद्योगांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज, देशात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक केलेल्या जर्मन उद्योग समूहांसाठी लागणारे मनुष्यबळ आदींबाबत चर्चा केली.

यावेळी श्री. फॅबिग यांनी येत्या काही दिवसात जर्मनीचे प्रतिनिधीमंडळ महाराष्ट्रात भेट देणार असून त्यावेळी याबाबत अधिक विस्तृत आणि तपशीलवार चर्चा होईल, असे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!