दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरातील जिंती नाका ते बारामती पूल परिसरातील बाणगंगा नदीवरील पूल येथील अपघाती वळणावर अनेक जणांना आपल्या प्राणांची बाजी द्यावी लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आळंदी – पंढरपूर महामार्गावर असणार्या फलटण शहरात प्रवेश केल्याची जाणीव खड्ड्यांनी होते. फलटण स्मशानभूमी जवळ असणाऱ्या बाणगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. या पुलावरील रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांचा ताबा सुटून मोठमोठे अपघात होत आहेत. काही महिन्यांपूर्वी याच पुलावरुन जड वाहतूक करणारा ट्रेलर नदीत कोसळून एकाला आपले प्राण द्यावे लागले होते. चारचाकी तसेच मोठ्या वाहनांबरोबरच सायकलस्वार आणि दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असे मत स्थानिक व्यक्त करीत आहेत.
हा रस्ता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका हात वर करून मोकळे होतात.
रस्ते विकास महामंडळाचे कार्यालय पुणे येथे असल्यामुळे त्यांच्याशी सहजासहजी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे किती नागरिकांनी आपले प्राण गमवल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, याच रस्त्यावर असणार्या जिंती नाका ते नाना पाटील चौक येथे अतिक्रमण वाढल्यामुळे बकालपणा वाढला आहे. ही अतिक्रमणे सुद्धा अपघाताला निमंत्रण देत आहेत.
या रस्त्यावरून सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रवास करतात, मात्र त्यांना कधी कसा त्रास होत नाही अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.