सातारा जिल्ह्यातील बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ.भारत पाटणकर आदी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रस्तावित आहे. जावळी तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे प्रस्तावित धरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे, असे बैठकीत आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण आवश्यक आहे असे सांगितले.

यावर धरणाच्या पूर्ततेसाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने आवश्यक कार्यवाही करावी. धरणासाठी आवश्यक असणारे सर्व्हेक्षण करुन घ्यावे. सर्व्हेक्षणासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर जलसंपदा विभागाने धरणाचे सर्व्हेक्षण, अन्वेषण आणि संकल्पन याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

बैठकीस नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभाग प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहाणे, अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, पुनर्वसन विभागाचे उपसचिव धनंजय नायक, विशेष कार्यकारी अधिकारी सी. आर. गजभिये आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बोंडारवाडी धरण प्रकल्प, प्रकल्पाची प्रगती आणि भविष्यात करावयाच्या कामाबाबत माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!