
दैनिक स्थैर्य । दि. 26 मे 2025 । फलटण । गेल्या काही दिवसांपासून फलटण शहरासह तालुक्यामध्ये संततधार व मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. पावसाने खूपच नुकसान केले असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी NDRF चे पथक फलटणमध्ये काल रात्रीच दाखल झाले आहे.
आमदार सचिन पाटील यांच्यासमवेत NDRF च्या पथकाने सस्तेवाडी येथील पूरपरिस्थीची पाहणी केली असून, मदतीसाठी पथक फलटण येथे सज्ज आहे. सस्तेवाडीमधील वाबळेवस्ती येथे बाणगंगा नदी व सस्तेवाडीच्या ओढ्याच्या घेरावामुळे जवळपास ४० ते ५० नागरिक अडकले होते. त्याठिकाणी आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी पाहणी करून NDRF च्या पथकाच्या माध्यमातून सदरील नागरिकांना सुखरूप रित्या स्थलांतरित करण्यात आले आहे.
NDRF पथकाच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यात यश मिळाले आहे. स्थानिक नागरिकांनीही NDRF पथकाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. बचाव कार्यात NDRF च्या पथकाने चांगली कामगिरी केली आहे.