दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२२ । लोणंद । अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून राहीलेल्या लोणंद विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेस, भाजप, सेना असे तीन पक्षांनी एकत्र येऊनही राष्ट्रवादीची तालुक्यातील विजयी घोडदौड थांबवू शकले नाहीत.
लोणंद विकास सोसायटीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी तसेच भाजप, काँग्रेस, शिवसेना अशा सर्वांनीच चंग बांधला होता. ना. रामराजे नाईक निंबाळकर व राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची तालुक्यात सर्वत्र विजयी घोडदौड चालू असताना लोणंदचे जेष्ठ नेते आनंदराव शेळके-पाटील, काँग्रेसचे युवा नेते सर्फराज बागवान, शिवसेचे विश्वास शिरतोडे भाजपचे युवा नेते राहुल घाडगे यांच्या कालभैरवनाथ परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून भाजप काँग्रेस व सेना यांनी एकत्र येऊन मोर्चेबांधणी करीत निवडणूकपूर्व तगडे आव्हान निर्माण केले होते मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत कालभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलने काल झालेल्या निवडणुकीत तेरा पैकी दहा जागा जिंकत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले तर विरोधी परिवर्तन पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.
अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत कालभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचे लालासो शेळके , पोपट राऊत , संतोष शेळके , सुरेश लक्ष्मण शेळके , नामदेव क्षीरसागर , सुरज शेळके , गणेश क्षीरसागर , सुजाता शेळके सागर शेळके , उत्तम पवार यांनी विजय मिळवला तर कालभैरवनाथ परिवर्तन पॅनलच्या मोहन क्षीरसागर ,चारूशिला भिसे , किरण क्षीरसागर यांनी विजय संपादन केला.
काल दिनांक २२ रोजी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत लोणंद विकास सोसायटी साठी मतदान पार पडले. त्यामधे १०१७ पैकी ८०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . त्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी करण्यात आली. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देविदास एच मिसाळ यांनी काम पाहिले.