स्थैर्य, फलटण, दि. ०६ : होळ ता.फलटण येथे खंडाने घेतलेल्या जमिनीत अनधिकृत गौनखनिज तथा अवैध पणे माती मिश्रीत वाळूचा उपसा करीत पंचनामा व तेथील वाहने जप्त करीत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश माने व इतर अनोळखी दोघे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता या परिसरात वाळू पडल्याचे पाहण्यास मिळाल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे पंचाच्या समक्ष पाहणी करून पंचनामा केला असून या ठिकाणी 120 ब्रास वाळू उपसा झाला असून अवैध गौनखनिज उत्खनन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश माने यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 120 ब्रास माती मिश्रीत वाळू काढल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, होळ (साखरवाडी) ता.फलटण हद्दीतील गट नं.274 येथील जमीन सतीश श्रीकांत माने रा.साखरवाडी यांनी शेती महामंडळ यांचेकडून खंडाने घेतली आहे. या ठिकाणी सतीश माने यांनी 16 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.30 वाजता पॉकलेन व इतर वाहनांच्या साहाय्याने 8 मीटर × 6 मीटर × 7 मीटर लांबी, रुंदी, उंचीचा खड्डा खोदून त्यातून सुमारे 120 ब्रास माती मिश्रीत वाळूचे उत्खनन केलेले आहे. यावेळी सतीश माने यांनी सांगितले की मी हे शेततळे करीत आहे. दरम्यान याची पाहणी केली असता या ठिकाणी माती मिश्रीत वाळू काढली असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही तहसीलदार समीर यादव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या ठिकाणी पंचनामा केल्यानंतर तेथे lnt कंपनीचे 200 पॉकलेन मशीन व ट्रॅक्टर निदर्शनास आला.सदरची वाहने ताब्यात घेत असताना सतीश माने यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ही वाहने ताब्यात घेण्यास विरोध केला. दरम्यान या विरोधामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतिश श्रीकांत माने यांच्या सह इतर दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास साबळे करीत आहेत, असेही तहसीलदार समीर यादव यांनी स्पष्ट केले.