
‘महत्वाच्या विजयात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा, त्यामुळे उपनगराध्यक्षपद आम्हालाच मिळावे’; गौरव नष्टे यांचे तालुकाध्यक्षांना पत्र.
स्थैर्य, फलटण, दि. 27 डिसेंबर : नुकत्याच पार पडलेल्या फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केला असतानाच, आता सत्तेच्या वाटाघाटीला सुरुवात झाली आहे. फलटण पालिकेचे महत्त्वाचे मानले जाणारे ‘उपनगराध्यक्ष’ पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावे, अशी अधिकृत मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे फलटण शहराचे उपाध्यक्ष गौरव लक्ष्मणराव नष्टे यांनी पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांना लेखी पत्र दिले आहे.
गौरव नष्टे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्ष अशा महायुतीने ‘न भूतो न भविष्यती’ असा विजय मिळवला आहे. या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता दिवसरात्र पळून हा विजय खेचून आणण्यासाठी झटला आहे.
त्यामुळे, या कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आणि पक्षाच्या योगदानाचा सन्मान राखण्यासाठी फलटण नगरपालिकेचे ‘उपनगराध्यक्ष’ पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावे, अशी विनंती त्यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे केली आहे.
फलटणमध्ये नगराध्यक्षपदी भाजपचे समशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहेत. त्यामुळे आता सत्तेतील वाटा म्हणून उपनगराध्यक्ष पद राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता असली, तरी भाजपच्या गोटातूनही इच्छुकांची गर्दी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गौरव नष्टे यांच्या या पत्राने आता राष्ट्रवादीने उघडपणे या पदावर दावा ठोकल्याने वरिष्ठ नेते यावर काय निर्णय घेतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

