अल्पसंख्याक शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घ्यावा – सादिक खाटीक यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । आटपाडी । अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची केंद्र सरकारने बंद केलेली शिष्यवृत्ती पुन्हा चालु करताना वाढवून वार्षीक १० हजार रुपये केली जावी म्हणून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री .शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केंद्राकडे प्रयत्न करण्यासाठी आमदार जयंतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केले आहे . इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत च्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जाणारी वार्षीक १ हजार रुपये शिष्यवृत्ती केंद्र सरकारने नुकतीच बंद केल्याने लाखो अल्पसंख्याक मुलांवर अन्याय होणार असून ही रद्द केलेली अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, वार्षीक १० हजार रुपये अशी वाढ करीत पुन्हा तातडीने सुरु केली जावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून यशस्वी प्रयत्न व्हावेत अशा आशयाचे निवेदन सादिक खाटीक यांनी आज इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांना दिले .

या निवेदनाचा ईमेल खा . शरदचंद्रजी पवार, खा . प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रियाताई सुळे, खा . श्रीनिवास पाटील, खा. फौजिया खान,खा. सुनिल तटकरे, खा . अमोल कोल्हे, खा . मोहंमद फैजल, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मोहंमद खान पठाण यांना पाठविण्यात आला आहे . २००८ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय मंत्री श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आणि अल्पसंख्यांक मंत्री दिवंगत बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी, देशातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. देशातील करोडो अल्पसंख्याक विद्यार्थी याचा लाभ घेत होते. यावर्षी राज्यातल्या १३ लाख अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते, त्यासाठी पालकांना बँकेत खाते खोलण्यासाठी, उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी, मोठे कष्ट घ्यावे लागले होते. तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सुद्धा मोठे कष्ट घेत या शिष्यवृत्तीचे अर्ज शासनाकडे पाठवले होते. या शिष्यवृत्तीमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लागत होता. विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, शूज, वह्या इत्यादी पैकी काही साहित्य घेण्यासाठी या शिष्यवृत्तीची मोठी मदत मिळत होती. केंद्र सरकारने ही शिष्यवृत्ती रद्द केल्याने महाराष्ट्रासह देशांमधील करोडोंच्या घरात अल्पसंख्यांक विद्यार्थी या शिष्यवृत्ती पासून दुरावणार आहेत. शाळा पातळी पासून जिल्हा, राज्य, केंद्र स्तरापर्यंत याचे सर्व सोपस्कार विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी पूर्ण केले होते, याकडे लक्ष वेधून सादिक खाटीक यांनी, केंद्राच्या सामाजीक न्याय विभागाने आरटीई २००९ कायद्यांतर्गत पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षण मोफत असल्याचे सांगून या वर्गाना शिष्यवृत्ती देण्याची आवश्यकता नसल्याचा अहवाल दिल्याचे समजते. त्यास अनुसरून हा शिष्यवृत्ती रद्दचा निर्णय केंद्राच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने घेतल्याचे कळते. तथापि या धक्कादायक निर्णयाने राज्यातल्या आणि देशातील करोडो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. अल्पसंख्यांक समुदायातील मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारशी आणि जैन धर्मीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद झाल्याने त्यांच्या शिक्षणावर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही शिष्यवृत्ती पुन्हा चालू करावी. तसेच वार्षिक एक हजार रुपयांच्या या शिष्यवृत्तीत आणखी नऊ हजार रुपयांनी वाढ करीत ही शिष्यवृत्ती प्रतिवर्षी दहा हजार रुपये प्रमाणे करून ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दिली जावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केंद्र सरकारकडे पुढाकार घ्यावा म्हणून आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून पवार साहेबांकडे आग्रह धरत असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले . करोडो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा हा राष्ट्रीय स्तरावरचा महत्वाचा प्रश्न सोडविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची वरीष्ठ नेतेमंडळी महत्वपूर्ण भूमिका बजावतील अशी आशा ही सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे .


Back to top button
Don`t copy text!