राष्ट्रवादीच्या मंदा बर्गे कोरेगावच्या उपनगराध्यक्षा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, कोरेगाव, दि. 28 : कोरेगावच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या ज्येष्ठ नगरसेविका मंदा किशोर बर्गे यांची सोमवारी ऑनलाइन बिनविरोध निवड झाली. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीने नगरसेवकांची बैठक घेतली. 17 पैकी 11 नगरसेवक या निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते.

कोरेगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा संगीता नवनाथ बर्गे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उपनगराध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया जाहीर केली होती.

अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवड प्रक्रियेस सुरुवात झाली. यावेळी मुख्याधिकारी विजया घाडगे, मंडल अधिकारी किशोर धुमाळ, अव्वल कारकून अजित शेंडे, तलाठी चंद्रकांत गायकवाड, कार्यालय अधीक्षक नितीन सावंत उपस्थित होते.

मंदा किशोर बर्गे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. ज्योती पाटील यांनी छाननी केल्यानंतर तो अर्ज वैध ठरविला. त्यानंतर मंदा बर्गे यांची बिनविरोध निवड झाल्याचे पाटील यांनी जाहीर केले. विशेष बैठकीत 17 पैकी 11 नगरसेवक ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. ज्योती पाटील, नगराध्यक्षा रेश्मा कोकरे व मावळत्या उपनगराध्यक्षा संगीता बर्गे यांनी मंदा बर्गे यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय पिसाळ यांच्यासह नगरसेवकांनी आपल्या मनोगतामध्ये मंदा बर्गे यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. कोरेगावात ग्रामपंचायत असताना मंदा किशोर बर्गे यांनी उपसरपंचपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर बर्गे यांच्या त्या पत्नी आहेत. शहर विकासाला सर्वोच्च प्राधान्य राहणार असून, नगरपंचायतीचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मंदा बर्गे यांनी निवडीनंतर सांगितले.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!