लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । लोणंद ।  लोणंद नगरपंचायतच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या राष्ट्रवादीने सतरा पैकी दहा जागा काबीज करत नगरपंचायतीची सत्ता एकहाती मिळवली.

अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दहा जागा मिळवत बाजी मारली तर मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा जागा मिळवलेल्या काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर विजय मिळवता आला. तर भाजपनेही तीन जागी विजय संपादन करून मागच्यापेक्षा एक जागा अधिक मिळवली तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेला यावेळीही भोपळा फोडता आलेला नाही. या निवडणूकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जोराचे प्रयत्न करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे वर्चस्व अपेक्षितच असले तरीही भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तराची अपेक्षा मात्र फोल ठरली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत बाळासाहेब बागवान यांची उणीव आजच्या निकालावरून स्पष्ट दिसून आली. बाळासाहेब बागवान यांचे वारसदार सर्फराज बागवान यांनादेखील हार स्वीकारावी लागली. त्यांचा पराभव माजी नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. तर भाजपचे नेते असलेल्या आनंदराव शेळके-पाटील यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यातच शिवाजीराव शेळके-पाटील यांच्यासमोर पराभवाचा सामना करावा लागला. तर प्रभाग क्रमांक बारा हा आजतागायत काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असलेल्या प्रभागातही राष्ट्रवादीच्या रशिदा इनामदार यांनी मोठ्या फरकाने काँग्रेसच्या माजी नगरसेविका स्वाती शरद भंडलकर यांचा पराभव केला.

या निवडणूकीत विजय संपादन केलेले उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते पुढील प्रमाणे प्रभाग एक – शेळके दिपाली संदीप – भाजप ५४१, प्रभाग दोन- बागवान आसिया साजिद – कॉग्रेस १९१, प्रभाग तीन- शेळके दिपाली निलेश – कॉग्रेस ३२२, प्रभाग चार – शेळके सचिन नानाजी राष्ट्रवादी ५४५, प्रभाग पाच – शेळके भरत शंकरराव -राष्ट्रवादी २८७, प्रभाग सहा- शेळके राजश्री रवींद्र – अपक्ष २०५,  प्रभाग सात- मधुमती पलंगे – राष्ट्रवादी ३८५, प्रभाग आठ- ज्योती डोणीकर- भाजप  ५६४, प्रभाग नऊ- शिवाजीराव शेळके , राष्ट्रवादी ३८७, प्रभाग दहा- सिमा वैभव खरात, राष्ट्रवादी ३४०, प्रभाग अकरा-  भरत बोडरे ३२७ चिठ्ठीवर विजयी घोषित , प्रभाग बारा- रशिदा इनामदार – राष्ट्रवादी २४६, प्रभाग तेरा- तृप्ती राहूल घाडगे, भाजप १२१, प्रभाग चौदा- सुप्रिया गणेश शेळके – राष्ट्रवादी ७३७, प्रभाग पंधरा- गणीभाई कच्छी, राष्ट्रवादी २९२, प्रभाग सोळा- प्रविण व्हावळ-काँग्रेस  १७५, प्रभाग सतरा- रविंद्र रमेश क्षीरसागर- राष्ट्रवादी ५८३

प्रभाग अकरा मधील शिवसेनेचे उमेदवार विश्वास शिरतोडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भरत बोडरे या दोघांनाही समसमान ३२७ मते मिळाल्याने या ठिकाणी चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार निश्चिती करण्यात आली. यामधे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासमोर समर्थ रोहित बुणगे या सात वर्षांच्या लहानग्याच्या हस्ते काढलेल्या चिठ्ठीत राष्ट्रवादीचे भरत बोडरे हे विजयी ठरल्यामुळे शिवसेनेचे खाते उघडता उघडता राहीले.

लोणंद नगरपंचायतीच्या या निवडणूकीत दोन पती-पत्नी जोडप्यांवर पराभवाची नामुष्की ओढवली. प्रभाग क्रमांक बारा मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका स्वाती भंडलकर यांचा पराभव राष्ट्रवादीतच्या रशिदा इनामदार यांनी केला तर स्वाती भंडलकर यांचे पती शरद भंडलकर यांना प्रभाग अकरा मधून अवघी तीन मते मिळाल्याने त्यांच्यावर नामुष्कीजनक पराभव स्वीकारण्याची वेळ आली. तर शिवसेचे विश्वास शिरतोडे यांना प्रभाग अकरा मधून चिठ्ठीवर कौल न मिळाल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला तर त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कुसूम विश्वास शिरतोडे यांनाही प्रभाग बारामधून पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपचे आनंदराव शेळके-पाटील आणि त्यांची स्नुषा प्राजक्ता संग्राम शेळके-पाटील यांनाही आपापल्या राष्ट्रवादीच्या प्रतिस्पर्ध्यांसमोर पराभवाचा सामना करावा लागला. तसेच माजी विरोधी पक्षनेते राजुशेठ डोईफोडे आणि राष्ट्रवादी चे गटनेते हनुमंत शेळके यांना पराभवाचा धक्का बसला.


Back to top button
Don`t copy text!