स्थैर्य, मुंबई, दि.१८: धनंजय मुंडेंविरोधात बोलल्यामुळे रविवारपासून आतापर्यंत 6 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यातील एकाने गोळी घालण्याची धमकी दिल्याचे ते म्हणाले. सोमय्या यांनी याप्रकरणी पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. सोमय्या यांनी धमकीचे आलेले फोन नंबरही सार्वजनिक केले आहे. किरीय सोमय्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर आरोपींचे फोटो शेअर केले आहेत.
फोन करणारा म्हणाला – डोक्यात 6 गोळ्या घालीन
सोमय्या म्हणाले की, रविवारी साडेअकरा वाजता त्यांना दोन धमकीचे फोन आले. फोन करणाऱ्याने माझ्या डोक्यात 6 गोळा घालण्याची धमकी दिली आहे. गेल्या दोन दिवसांत असे सहा धमकी देणारे कॉल त्यांच्याकडे आले. फोन करणारे त्यांना शिवीगाळ करीत असून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
मुंडे यांच्याविरूद्ध बोलल्याबद्दल धमक्या: सोमय्या
सोमय्या यांच्यानुसार, धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरून जेव्हा ते बोलू लागले तेव्हापासून ते धमकीचे फोन येत आहेत. सोमय्या यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे पत्नी, मुले व मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार केली होती.
किरीट सोमय्या यांनी सर्व आरोपींची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत