
दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२३ | फलटण |
पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या धंगेकर यांच्या विजयानंतर फलटण शहरामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह इतर घटक पक्षांनी विजयोत्सव साजरा केला; परंतु यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकार्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे राज्य पातळीवर महाविकास आघाडी कार्यरत असताना फलटणमध्ये महाविकास आघाडी कार्यरत आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
फलटण तालुक्याची एकहाती सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यरत आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाल्यानंतर फलटणमध्ये जो विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोणताही पदाधिकारी दिसला नाही; त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये फलटण शहरासह तालुक्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र काम करणार का? असा सवाल फलटणकर नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे.
विधानसभेच्या कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवताना सर्वच घटक पक्षांचे योगदान महत्त्वाचे ठरलेले आहे. केंद्रामध्ये व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे या सत्ताधार्यांना विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन जर काम केले तरच भारतीय जनता पार्टीला रोखण्यात यश येते; हे कसबा विधानसभा निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामध्येसुद्धा भारतीय जनता पार्टीला सत्तेत येऊ न देण्यासाठी महाविकास आघाडी दिसणार का? यासोबतच गेल्या महिन्यापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही जाहीर होऊ शकतात, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये फलटण तालुक्यात महाविकास आघाडी दिसणार का? असे प्रश्न सर्वसामान्य फलटणकरांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत.
फलटण तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्षांची ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपेक्षा अत्यंत कमी आहे; परंतु भारतीय जनता पार्टीचा सत्तेचा वारू रोखण्यासाठी आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्की कोणती भूमिका घेते, हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
फलटण नगरपरिषदेसह फलटण तालुक्याची सत्ता आपल्या हातामध्ये घेण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी दमदार कामगिरी करत आहे. गेल्या काही महिन्यापासून फलटण शहरासह तालुक्यामध्ये विविध विकासकामांसाठी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी भरघोस असा निधी मंजूर करून आणलेला आहे. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारचे विविध प्रकल्प हे फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. विविध विकासकामे ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंजूर करून आणलेली आहेत. त्यामुळे तालुक्यात आगामी काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वच घटक पक्षांची भूमिका काय राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.