
स्थैर्य, 27 फेब्रुवारी, सातारा : जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे निवडणुकीपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी व शिवसेना युतीवर दोन्ही पक्ष निकालानंतरही ठाम असून, अध्यक्ष आमचाच होणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीशी कितीही संधान साधण्याचा प्रयत्न केला, तरी भाजपला दूर ठेऊनच सत्ता स्थापन करण्याची राजकीय खेळी शिवसेना व राष्ट्रवादीने चालवल्याची चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर फुटाफुटीची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी व शिवसेनेने सदस्य अज्ञातस्थळी नेले आहेत. त्यामुळे भाजपला वगळून राजकीय सत्ता मिळविण्याची पडद्यामागून खेळी दोन्ही पक्षांची सुरू आहे, तसेच राष्ट्रवादीचे स्वःपक्षाचे 20 सदस्य, काँग्रेसचा एक, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सदस्य, तर शिवसेनेचे 15 सदस्यांची गटनोंदणी झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर कुठल्याही पक्षाकडे बहुमत न आल्याने सत्तेचा तिढा वाढला होता. निकालानंतर आता दोन आठवडे उलटले, तरी सत्तेची गुंतागुंत सुटलेली नाही. अशातच भाजपकडे बहुमताचा आकडा नसतानाही अध्यक्षपदावर दावा केल्याने शिवसेनेच्या नाराजीत आणखीनच भर पडली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता जिल्हा परिषदेत येणार असून, झेडपीचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार आहे. आमचे सर्व सदस्यही एकत्रित असून, राष्ट्रवादी व शिवसेना ताकदीने काम करत आहे. आमचे दोन्ही पक्षाचे संख्याबळ सत्ता स्थापनेसाठी पुरेसे आहे.
– बाळासाहेब सोळस्कर,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

