दैनिक स्थैर्य | दि. १८ जानेवारी २०२५ | फलटण | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डीत दोन दिवसीय ‘नव-संकल्प शिबीर २०२५’ आयोजित केले आहे. या अधिवेशनात एक महत्त्वपूर्ण घटना घडली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे या अधिवेशनास उपस्थित राहिले असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांच्याकडून समोर येत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांचा आदेश झुगारून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे कामकाज केले होते. यामुळे अजित पवार यांच्या विरोधात त्यांच्या भावना जागृत झाल्या होत्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे यांच्या गटाचे माजी आमदार दीपक चव्हाण यांचा पराभव करण्यात अजित पवार यशस्वी झाले होते. या पार्श्वभूमीवर, आगामी जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व अजित पवार यांच्यात पॅचअप होणार का ? असे प्रश्न सध्या तयार होत आहेत.
शिर्डी येथे आयोजित केलेल्या या अधिवेशनात शरद पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आली आहे. हे अधिवेशन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केले गेले आहे, ज्यामुळे राजकीय रणनीती आणि गठबंधनांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संकेत मिळत आहेत.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये हे पॅचअप कितपत प्रभावी ठरेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेत कोणते बदल होतील, याची उत्सुकता राजकीय निरीक्षकांमध्ये आहे. शिर्डी अधिवेशनातून निघालेले हे संकेत भविष्यातील राजकीय दिशा निर्धारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.