
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराडतर्फे विशेष शिबिर. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन. व्यक्तिमत्त्व विकास आणि राष्ट्रप्रेमाचे धडे.
स्थैर्य, दापोली, दि. 25 डिसेंबर : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे १९ महाराष्ट्र बटालियन (BN) एनसीसी कराड यांच्या वतीने १९ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विशेष प्रशिक्षण शिबिराचे (CATC) आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ३०० हून अधिक एनसीसी कॅडेट्सनी सहभाग नोंदवला असून, त्यांना शिस्त, नेतृत्वगुण आणि आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत.
या शिबिराचा मुख्य उद्देश कॅडेट्समध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजवणे हा आहे. शिबिरात ड्रिल, शस्त्र हाताळणी, फायरिंग, नकाशा वाचन, फील्ड क्राफ्ट आणि प्राथमिक उपचार याचे सखोल प्रशिक्षण दिले जात आहे. यासोबतच राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वाहतूक नियम, भारतीय सैन्यात प्रवेशाची माहिती, व्यक्तिमत्त्व विकास आणि आरोग्य या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
या शिबिराचे खास आकर्षण म्हणजे एनडीआरएफ (NDRF – National Disaster Response Force) मार्फत दिले जाणारे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण. या कार्यक्रमाचा शुभारंभ २० डिसेंबर रोजी सातारचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आणि रत्नागिरीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय विजया सूर्यवंशी यांच्या हस्ते झाला. कॅडेट्सना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव कार्य कसे करावे, प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येत आहे.
केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर कॅडेट्सच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ट्रेकिंगचेही आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या सत्रात कॅडेट्सचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, त्यांच्या कलागुणांना वाव दिला जाणार आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी १९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सत्यशील बबेर, प्रशासकीय अधिकारी कर्नल पदमानाभन आणि कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एल. कुणकेरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. संजय भावे यांचेही या उपक्रमाला विशेष पाठबळ मिळाले आहे. सहयोगी एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. एच. व्ही. बोराटे आणि बटालियनचे सर्व अधिकारी व कर्मचारी शिबिराच्या नियोजनात मोलाची भूमिका बजावत आहेत.
