
स्थैर्य, मुंबई , दि.२३: ड्रग्ज केनक्शन प्रकरणात बॉलिवूडच्या अडचणी वाढताना दिसत असून सिनेतारकांचे व्यवस्थापन करणारी एजन्सी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) रडारवर आली आहे. या एजन्सीच्या सीईओंना समन्स बजावण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे, ही एजन्सी अभिनेत्री दीपिका पदुकोणशी संबंधित असून दीपिकाचादेखील या प्रकरणाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दीपिका, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना एनसीबीने समन्स पाठवल्याची माहिती आहे. हा बॉलिवूडसाठी एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात त्याची मैत्रिण रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक यांचा अमली पदार्थांशी संबंध समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीने काही दलालांचीही धरपकड केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीने सिने क्षेत्रातील काही बड्या तारकांवर लक्ष केंद्रित केले आहे. एनसीबीतील सूत्रांनुसार, जया साह नावाची महिला रिया चक्रवर्तीला अमली पदार्थ पोहोचवत होती, असे दोघींमधील चॅटमधून समोर आले आहे. जयाचा सिनेतारकांचे व्यवस्थापन पाहणा-या या एजन्सीशी संबंध आहे. यामुळेच जयाला एनसीबीने समन्स बजावले आहे.