
म्हसवड – येथील उभे नवरात्रातील व्रत करणारे भक्त. (छायाचित्र : अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, सातारा, दि. 31 ऑक्टोबर : दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महसवड शहर सध्या भक्तिभावाच्या लहरींनी उजळले आहे. ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्याची लगीनघाई सध्या सुरू असून, दिवाळी पाडव्यापासून तुलसी विवाहापर्यंत चालणार्या उभ्या नवरात्राच्या कठोर उपासनेला प्रारंभ झाला आहे. प्राचीन परंपरेला अनुसरून भाविक मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने या उपासनेत सहभागी होत आहेत.
माणगंगेच्या तीरावर उभे असलेले दहाव्या शतकातील हे हेमाडपंथी श्री सिद्धनाथ मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवाने ओतप्रोत आहे. या मंदिरात पूर्वापार चालत आलेल्या अनेक व्रतपरंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळल्या जात आहेत. दिवाळी पाडव्याच्या पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील मुख्य पुजारी आणि सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना करून या बारा दिवसांच्या उभ्या नवरात्राचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. या दिवसापासून उपवास करणारे भाविक दररोज पहाटे चार वाजता कार्तिक स्नान करून श्री सिद्धनाथमंदिरापासून सुरू होणारी नगरप्रदक्षिणा घालतात.
संपूर्ण नगरातून निघणार्या या प्रदक्षिणेत श्रींच्या नावाचा अखंड जप, भजन, कीर्तन आणि जय सिद्धनाथ महाराजच्या गजराने वातावरण भारून जाते. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून ते तुलसी विवाहापर्यंत दररोज पहाटे प्रदक्षिणा घालत भाविक व्रतपूर्तीचा संकल्प पाळतात. या नगरप्रदक्षिणेचा मार्ग सिद्धनाथ मंदिरापासून महादेव मंदिर, माणगंगा नदीपात्र, बाजारपेठ, विठ्ठल व जोतिबा मंदिर, खंडोबा मंदिर, सिद्धनाथ
हायस्कूलमार्गे तुळजाभवानी मंदिर, वडजाई ओढा, मरीआई मंदिर, रथगृह, महादेव व मास्ती-शनि मंदिर, श्रीनाथ मठ आणि पुन्हा सिद्धनाथ मंदिर असा ठरलेला आहे. या काळात संपूर्ण म्हसवड गाव श्रींच्या भक्तीने न्हाऊन निघते.
या व्रताचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ पुरुष भाविकच सहभागी होतात, उपवास, संयम आणि भक्तिभावाने पार पडणार्या वा नवरात्रात प्रत्येक रविवारी उपवास करणारे भाविक गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या राजाच्या बागेतीलम्हातारदेव मंदिरात प्रदक्षिणा घालतात आणि परत येताना वडजाई मंदिरात दर्शन घेतात. या धार्मिक यात्रेचा भाविकांना वेगळाच अध्यात्मिक अनुभव मिळतो.
रविवार, दिनांक 2 नोव्हेंबर रोजी कें पत्हाटे साडेपाच वाजता तुलसी विवाहदिनी पट उठवून या बारा दिवसांच्या उपवासाची सांगता होईल, त्याच रात्री बारा वाजता श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा शाही मंगल विवाह सोहळा पारंपरिक व धार्मिक विधीपूर्वक मोठ्या थाटात पार पडणार आहे. श्री माण तालुक्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविक या सोहळ्यासाठी म्हसवडला दाखल होणार असून मंदिर परिसर सजावटीने उजळून निघाला आहे. श्रींच्या जयघोषात, भक्तीच्या भावसागरात आणि पारंपरिक संस्कृतीच्या निष्ठावान आविष्कारात हे उभे नवरात्र संपूर्ण म्हसवडला पुन्हा एकदा आध्यात्मिक उर्जेने प्रज्वलित करत आहे.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					