
दैनिक स्थैर्य । 28 जुलै 2025 । फलटण । फलटण शहर व परिसरात नागपंचमीसणानिमित्त पतंग उडविण्याचा छंद जोपासतात. मात्र, पतंग उडवताना वापरण्यात येणारा चायना मांजा हा मानव जातीला व पशु पक्षाला घातक आहे. चायनीज मांजामुळे अनेक पक्षांना जीव गमवावे लागलेले आहे. यासाठी चायनाीज मांजाचा वापर न करण्याचे आवाहन येथील नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर व आकांक्षा क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने एका जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे, माजी प्राचार्य सुधीर इंगळे, आकांक्षा क्लासेसचे संजय जाधव, नेचर अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. रॅलीमध्ये ‘आभाळ आहे पक्षांचे, नाही चायना मांजाचे, एक पतंग आकाशात, हजारो पक्षी धोक्यात, बंद करा, बंद करा, चायना मांजा बंद करा’ अशा आशयाच्या घोषणा देण्यात येत होत्या. मुधोजी हायस्कूल येथून सुरू झालेली रॅली गजानन चौक – महात्मा फुले- चौक डेक्कन चौक- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक- तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून फिरून पुन्हा या रॅलीची सांगता मुधोजी हायस्कूल येथे करण्यात आली.
प्राचार्य सुधीर इंगळे म्हणाले चायना मांजा हा पर्यावरणासाठी तसेच वन्यजीव प्राण्यासाठी घातक आहे. चायना मांजाचे लवकर विघटन होत नाही. त्यामुळे तो पर्यावरणासाठी देखील हानिकारक आहे.
अलीकडे शासनाने देखील चायना मांजाचा वापर करण्यावर बंदी आणलेली आहे.त्यामुळे चायना मांजा कोणीही वापरू नका. चायना मांजा वापरत असताना आढळून आल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होतात.
दरम्यान, येथील महावितरण लघुदाब व उच्चदाब वाहिनीमध्ये पतंगाच्या मांजा अडकल्याने दिवसभरात दोन तीन वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे युवकांनी पंतग उडविताना महावितरणाच्या विद्युत वाहिनीपासून अंतर ठेवून पंतग उडविण्याचा आनंद घ्यावा.
रविंद्र आप्पासाहेब ननवरे,
(फलटण शहर शाखा अभियंता, महावितरण)