
‘राजे गट’ अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, शरद पवार गटाच्या नेत्याच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या
स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या ‘जय व्हीला’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. ‘राजे गट’ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, शरद पवार यांचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या नेत्याच्या या भेटीमुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मेहबूब शेख यांनी स्वतः आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या भेटीची माहिती दिली असून, यावेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून, विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘राजे गट’ अजित पवार गटात सक्रिय होणार असल्याचे बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत, शरद पवार यांचे विश्वासू सहकारी आणि पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी थेट श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की यामागे काही राजकीय समीकरणे आहेत, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.