छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । छत्रपती शिवाजी कॉलेज मधील  इतिहास विभागाच्या वतीने रुसाअंतर्गत भारतीय स्वातंत्र्य आणि छत्रपती शिवाजी कॉलेजच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांच्या मार्गदर्शानाखाली ‘इतिहास विषयातील करिअरच्या संधी’ या विषयावरील  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये प्रथम सत्रामध्ये डॉ. एन. जी. प्रकाश (मंड्या, कर्नाटक) यांनी ‘दैनंदिन जीवनातील इतिहासाचा उपयोग’  या विषयावर मार्गदर्शन केले.  याप्रसंगी त्यांनी  सर्व शास्त्राचा प्रेरणा स्तोत्र इतिहास असून तोच सर्व शास्त्राचे मूळ आहे असे सांगितले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रांमध्ये डॉ.कविता गगराणी, न्यू कॉलेज, कोल्हापूर यांनी ‘इतिहास विषयातील करिअरच्या संधी’  या विषयावर मार्गदर्शन केले. इतिहास विषय घेऊन आपण शिक्षक,  टुरिस्ट गाईड, संशोधक, नागरी सेवा, पत्रकार, पुराभिलेखागार, वस्तुसंग्रहालय, मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था, ऐतिहासिक मालिकांचे स्क्रिप्ट रायटिंग, खाद्य संस्कृती, कॉस्ट्यूम डिझाईन यासारख्या क्षेत्रात करिअर करू शकतो या संदर्भात त्यांनी माहिती दिली. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रामध्ये युनिक अॅकॅडमी, पुणे येथील श्री. शरद पाटील यांनी स्पर्धा परीक्षा आणि इतिहास या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय?  स्पर्धा परीक्षांचे वेगळेपण,त्यासाठी लागणारी पात्रता, वर्ष व  गुणविश्लेषण याबद्दलची अत्यंत  सविस्तरपणे  माहिती दिली. कार्यशाळेच्या चौथ्या सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील  श्री. पांडुरंग आंबले यांनी ‘मोडी लिपी आणि रोजगाराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. मोडी लिपीतील कागदपत्रांच्या लिप्यांतरातून उपलब्ध होणाऱ्या आर्थिक संधीची त्यांनी माहिती दिली. भूगोल विभाग प्रमुख डॉ.आर. आर. साळुंखे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

कार्यशाळेच्या प्रारंभी समन्वयक डॉ.विकास येलमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रा. एम. एस.निकम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. आर. व्ही. कुंभार यांनी मानले तर विद्यार्थिनी  शीतल राठोड हिने सूत्रसंचालन केले. यावेळी विविध महाविद्यालयातून एकूण ९८ प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रो. (डॉ.) अनिलकुमार वावरे, डॉ. रोशनआरा शेख, डॉ. रामराजे माने –देशमुख,रुसा योजनेचे समन्व्यक डॉ. सुभाष कारंडे, इतिहास विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) धनाजी मासाळ  यांचेही  मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर इतिहास विभागातील प्रा. डॉ. दत्तात्रय कोरडे, प्रा.महादेव चिंदे, प्रा.एस.टी. ठोकळे, डॉ.सीमा कदम,  प्रा.कबीरदास वाघमारे व माधवी गोडसे  यांनी सहकार्य केले. शिवाय महाविद्यालयातील प्रशासकीय सेवक व विभागाचे विद्यार्थी यांच्या सहकार्यातून सदरचा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.


Back to top button
Don`t copy text!