दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी संपूर्ण भारतामध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय नेहरू चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य ननवरे ए. वाय., ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य देशमुख ज्ञानेश्वर, ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक महेश खुटाळे, तालुका क्रीडा अधिकारी हितेंद्र खरात, मुधोजी महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर स्वप्नील पाटील, सीनियर हॉकी खेळाडू सुजित निंबाळकर व सचिन लाळगे उपस्थित होते.
राष्ट्रीय खेळ दिवस असल्यामुळे ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय व विद्यापीठ स्तरावर सहभाग घेतला आहे व प्राविण्य मिळविले, अशा खेळाडूंचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये विद्यापीठ खेळाडू म्हणून गणेश पवार, मोहसीन बागवान, मौसम दोशी, निशांत गायकवाड, विनय नेरकर, वैष्णवी अलगुडे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय खेळाडू म्हणून ऋषिकेश पवार, निशा शर्मा व अनुराधा ठोंबरे व समर अहिवळे यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी शिवाजीराव घोरपडे यांनी खेळाडूंना राष्ट्रीय खेळ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच खेळाडूंनी खेळामध्ये सातत्य, जिद्द व चिकाटी ठेवली पाहिजे, असे सांगून त्यांची स्वतःची नात कु. देविका घोरपडे ही कशी लहानपणापासून सराव करत होती व आता ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कशी पोहोचली, याचादेखील आवर्जून उल्लेख केला.
प्रास्ताविक क्रीडा विभागप्रमुख सचिन धुमाळ यांनी केले. प्रास्ताविकामध्ये मेजर ध्यानचंद यांच्याविषयी त्यांनी माहिती सांगितली. जगातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या ऑलम्पिकमध्ये हॉकीत सलग आठ सुवर्णपदके आपल्या देशाला मिळाले, त्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोलाचा वाटा होता. तसेच मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक हजार गोल नोंदवले. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट असल्यामुळेच व भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये हा दिवस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो, असे सांगितले.
उद्घाटनानंतर १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटामध्ये सामने खेळविण्यात आले. १७ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने विजेतेपद पटकावले व उपविजेतेपद के. एस. डी. शानबाग, सातारा यांनी, तर मुलांच्या गटांमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संघाने उपविजेतेपद पटकावले व के. एस. डी. शानबाग विद्यालय, सातारा या संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेचे पंच म्हणून विनय नेरकर, ऋषिकेश पवार, यश साबळे, कु. वैष्णवी अलगुडे, अभिषेक घोरपडे, निशांत गायकवाड, यांनी काम पाहिले.
सूत्रसंचालन मुधोजी हायस्कूलचे ज्येष्ठ क्रीडाशिक्षक खुरंगे बी. बी. यांनी केले. सातारा जिल्हा क्रीडाधिकारी व सातारचे ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक श्री. हितेंद्र खरात यांनी आभार मानले.