दैनिक स्थैर्य | दि. १४ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर तरडगाव, तालुका फलटण येथे दि. १३ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एजुकेशन सोसायटी, फलटण तथा माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार दीपकराव चव्हाण हे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, स्थापना, पार्श्वभूमी व शिबिरामध्ये राबवायचे उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी दिली.
यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे महत्व, ग्रामीण भागाचा विकास, मूलभूत उद्दिष्ट्ये या विषयावर लक्ष केंद्रित केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तरडगाव येथे समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला कार्यक्रम, प्रभात फेरी, आरोग्य विषयक जनजागृती, जलसंवर्धन आणि जैवविविधता, माती व पाणी परीक्षण, स्त्री सक्षमीकरण व्यसनमुक्ती व आरोग्य सवर्धन, मतदार जनजागृती अभियान, वृक्षारोपण, माती परीक्षण, समाज प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, डिजिटल लिटरसी यासारखे सामाजिक जिव्हाळ्याचे व कृषि संबधित उपक्रम शिबिर कालावधीत गावामध्ये राबविणार असल्याचे कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
वसंतकाका गायकवाड यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हे उत्कृष्ट काम करतील, असा आशावाद व्यक्त केला व गावातील ग्रामस्थ स्वयंसेवकांना सहकार्य करतील, अशी ग्वाही दिली.
तरडगाव परिसरातील ग्रामस्थ विशेष करून महिलांनी, युवकांनी या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वयंसेवकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात माजी आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला मंडळ कृषि अधिकारी श्री. राहुल खाडे, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला, युवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे, प्रा. महेश बिचुकले व स्वंयसेवक उपस्थित होते.
सूत्रसंचालन कु. तनिष्का दौंडकर व कु. श्रद्धा शिर्के यांनी केले. आभार प्रा. सागर तरटे यांनी मानले.