स्थैर्य,दि २: औद्योगीकरण हा राष्ट्राच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. भारतात औद्योगीकरणाची सुरुवात ही स्वातंत्र्यपूर्व काळात जरी सुरू झाली असली तरी खऱ्या अर्थाने औद्योगीकरणाला चालना ही स्वातंत्र्योत्तर काळात मिळाली.
औद्योगीकरणाची भरभराट होत असताना ,प्रामुख्याने कारखान्यातील अपघातांचे वाढत जाणारे प्रमाण व त्यामुळे निर्माण होणारे आर्थिक नुकसान व जीवितहानी हा चिंतेचा विषय बनला. त्याचीच परिणीती म्हणून कारखान्यातील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी 1966 झाली सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली. 4 मार्च या सुरक्षा परिषदेचा स्थापनेचा दिवस ग्राह्य धरून 1972 सालापासून राष्ट्रीय सुरक्षा दिवस पाळण्याचं घोषित करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व अपघातांत पासून बचाव करणे हा मूळ उद्देश हा दिन साजरा करण्यामागे आहे.
आज 50 व्या वर्षात पदार्पण करताना या राष्ट्रीय सुरक्षा दिनाच स्वरूप फारच व्यापक झालेल आहे. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण सप्ताह राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने सुरक्षा मोहीम जनसामान्यांपर्यंत पोहोचली आहे.
4 मार्च ते 11 मार्च या संपूर्ण सप्ताहात कारखान्यांमध्ये सुरक्षाविषयक विविध स्पर्धा, चर्चासत्रे तसेच इतर सुरक्षाविषयक जनजागृतीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित केले जातात. प्रत्येक औद्योगिक क्षेत्रातील आरोग्य स्वास्थ्य व सुरक्षा संचलनाच्या सहाय्याने तसेच विविध इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून सुरक्षा सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
आज राष्ट्रीय सुरक्षा दिन हा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असताना जनसामान्यात सुरक्षाविषयक जागरुकता आणि सुरक्षा बांधिलकी यामध्ये नक्कीच सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. शासकीय स्तरावरील विविध मोहिमा , रस्ता सुरक्षा अभियान, अग्निशमन सुरक्षेविषयक जन जागृती , शालेय स्तरावरील अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले सुरक्षा व पर्यावरण विषयावरील अभ्यासक्रम अशा विविध माध्यमातून लोकांमध्ये सुरक्षेची भावना वाढीस लागलेली आहे. परंतु असे असले तरी कारखाना किंवा रस्त्यावरील अपघात तसेच रासायनिक कारखान्यातील किंवा निवासी संकुलातील आगीचे प्रमाण म्हणावं तसं कमी झालेलं नाही. कारण काय बर असावं?
सद्य करोना परिस्थितीचा विचार करूया.करोना आणि स्वास्थ्य सुरक्षेचा विचार केल्यास शासकीय पातळीवरील आरोग्य सेवेतील निर्णय, वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमावली, इतर निर्बंध आणि जनसामान्यांनी घेतलेल्या सुरक्षेमुळे आपण करोना वर नियंत्रण मिळवू शकलो.
करोना नियंत्रणात आला परंतु सुरुवातीची जी भीती लोकांमध्ये होती ती आता दिसत नाहीये. कारणं बरीच आहेत परंतु एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आपण फक्त आपत्ती काळापुरता विचार करतो
लॉक डाउन नंतर काही कारखान्यांमध्ये पुरेशी काळजी न घेतल्यामुळे ते सुरू करताना अपघात झाले.काहींमध्ये जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. या सर्व अपघातांमध्ये एकच गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे खबरदारी काय घ्यायची होती हे माहिती असून सुद्धा ती घेण्यात आली नाही आणि अपघात झाला.
अपघात घडण्यापूर्वी अधिकांश वेळा पूर्वसूचना देत असतात , जसे गाडी बंद पडण्यापूर्वी अबनॉर्मल आवाज करते, तब्येत एखाद्या आजारा पूर्वी थकव्याची जाणीव करून देते, कारखान्यातील संयंत्रणादेखील वारंवार असे इशारे देत असतात.
सुरक्षा यंत्रणेचा विचार केल्यास आज कायदे, नियमावली ,धोक्यांची ओळख व त्याबाबतची सुरक्षा प्रणाली इत्यादींची माहिती सर्वत्र उपलब्ध आहे . सुरक्षा परीक्षण आणि कर्मचारी व्यवसायिक प्रशिक्षण यावर देखील भर देण्यात येत आहे, असे असून सुद्धा अपघात कसे घडतात?
कारण ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यासाठीची यासाठी नियमित देखभालतील निष्क्रियता, प्रक्रिया हाताळण्यासाठी वापरावयाच्या कार्य प्रणालीतील हलगर्जीपणा, प्रक्रियेतील नियंत्रण यंत्रणा बिघडणे किंवा बंद ठेवणे, प्रक्रियेतील साधन दुरूस्तीतील दिरंगाई, अपघात घडल्यास नियंत्रित आणण्याचा उपाय योजना कार्यरत नसणे अशा एक ना अनेक कारण अपघात घडण्यास नुसत्याच कारणीभूत नसतात तर त्या वेळीच नियंत्रणात न आणल्यास अपघातांचे स्वरूप वाढवतात. ही सर्व कारणे वेळीच ओळखून त्याची अंमलबजावणी केली तर नक्कीच अपघात नियंत्रणात येतील आणि होणारी जीवित आणि वित्तहानी टाळली जाऊन राष्ट्रीय उन्नतीला नक्कीच हातभार लागेल.
-सुधीर थोरवे, 9967643599.