जिल्ह्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन – मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । सातारा । जिल्ह्यात रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी 0 ते 5 वर्षाच्या आतील बालकांसाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्या दालनात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे,  समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे व समन्वय समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

पोलिओ लसीकरणासाठी जिल्ह्यात एकूण 2 हजार 471 लसीकरण बुथ उभारण्यात आले आहेत. लसीकरणादिवशी सर्व बालकांना लस मिळावी यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा (बाँड्री), नाके, एस.टी. स्टँड, रेल्वे स्थानके, विमानतळ, टोलनाके इ. ठिकाणी 146 ट्रान्सिट टीम कार्यरत राहणार आहेत. बांधकामची ठिकाणे, रस्त्याची कामे, खाण कामगार, ऊसतोड कामगार, विटभट्टया, मंदिरे, बगीचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या व फिरस्त्या वसाहती, फिरस्ते, प्रसुतीगृहे व खाजगी दवाखाने, तुरळक वाड्या इ. ठिकाणच्या बालकांच्या लसीकरणासाठी 167 मोबाईल टीम स्थापन करण्यात आल्या आहेत.

दि. 27 जानेवारी 2017 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची संगणकीकृत नोंदणी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा इ. द्वारा करण्यात येत आहे.नोंदणी केलेल्या बालकांना बुथवर येणे सोयीचे व्हावे यासाठी बुथचे ठिकाण व लसीकरणाचा दिनांक असलेली स्लिप वाटण्यात येत आहेत.

कोविड  संदर्भात बुथवर सॅनीटायझर, हात धुण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. बुथवरील लसीकरण करणाऱ्यास कर्मचारी, स्वयंसेवक, मोबिलायझर यांनी मास्क व ग्लोव्झ घालावेत व प्रत्येक लाभार्थीला लसीकरण केल्यानंतर आपल्या हाताला सॅनिटाईझ करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. बुथवर येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये योग्य ते अंतर ठेवण्याबाबत व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!