
स्थैर्य, सातारा, दि. 14 ऑगस्ट : छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा येथे राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धा व रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील, जिल्हा सामान्य रुग्णालय, सातारा व शासकीय नर्सिंग महाविद्यालय, सातारा यांनी सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय अवयवदानाचे औचित्य साधून शुक्रवार (दि. 7) रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालय व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील सहभाग घेतला. रॅलीची सुरुवात रुग्णालयाच्या आवारात नर्सिंग महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून करण्यात आली आणि रॅली दरम्यान पोवई नाका येथे देखील पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालय-पोवई नाका-कुबेर मंदीर-वैद्यकीय महाविद्यालय असा रॅलीचा मार्ग होता.
राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रॅलीनंतर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इ. चा समावेश होता. रांगोळी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तर पोस्टर स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनुक्रमे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांना 15 ऑगस्ट रोजी अधिष्ठाता व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.
अवयवदानाचे महत्व विषद करण्यासाठी विविध स्पर्धांबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. धीरज गोडसे यांनी अवयवदान या विषयावर व्याख्यान सादर केले. अवयवदानाचे महत्व व भविष्यकाळातील अवयवदानाची निकड लक्षात घेता अवयवदान ही काळाची गरज आहे असे त्यांनी व्याख्यानादरम्यान सांगितले. यानंतर कार्यक्रमस्थळी मा. अधिष्ठाता यांनी उपअधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधिक्षक इ. च्या उपस्थितीमध्ये सर्व उपस्थितांना शपथ दिली.
या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, उपअधिष्ठाता डॉ. भारती दासवाणी, , जिल्हा शल्यिचिकीत्सक डॉ. युवराज करपे, डॉ. राहुलदेव खाडे, वैद्यकीय अधिक्षक, डॉ. अनिल गोसावी, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक, डॉ. कल्पक कदरकर, उप वैद्यकीय अधिक्षक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.