दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । फलटण । आज फलटणच्या माझ्या भुमिमध्ये खो – खो खेळाला जात आहे. दहा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पाऊस होता. त्यामुळे स्पर्धावर जरा पावसाचे सावट होते. त्यावेळी माझ्यासह श्रीमंत संजीवराजे यांना स्पर्धा नक्की कश्या पार पडतील या बाबत साशंकता होती. परंतु पावसाने विश्रांती दिल्याने फलटणला संपन्न होणाऱ्या खो – खो स्पर्धा यशस्वी होतील, असा विश्वास विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडांगणावर राष्ट्रीय खो – खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन समारंभात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिकेत तटकरे, महाराष्ट्र खो – खो असोसिशनचे उपाध्यक्ष व आमदार अभिमन्यू पवार, आमदार दीपक चव्हाण, महाराष्ट्र खो – खो असोसिशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, भारतीय खो – खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल, भारतीय खो खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजित जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश गादेकर, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयराव मोरे, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा, महाराष्ट्र खो खो असोसिशनचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, भारतीय खो खो संघाच्या कर्णधार सुप्रिया गाढवे, फलटणचे तहसीलदार समीर यादव, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड व सातारा जिल्हा खो खो असोसिएनचे सर्व पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटणला स्वतःचा व खो – खोचा असा इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये खो – खो सह सर्वच खेळांना प्रोत्साहन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासह मान्यवरांनी काम केले आहे. श्रीमंत संजीवराजे यांच्या नेतत्वाखाली राज्यात खो – खो मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशात खेलो इंडियाची वाढ मोठ्या प्रमाणात सर्वच तालुक्यात आहे. धाराशिव येथे होणाऱ्या पुढील राष्ट्रीय खो – खो सामन्यासाठी सर्वांना येथूनच मी निमंत्रण देत आहे, असे मत महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे उपाध्यक्ष व औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.
फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याने भारताचा मोठा गौरव केला आहे. या भूमीला कितीही वेळा नमन केले तरी ते कमीच पडणार नाही. खो – खो हा फक्त महाराष्ट्र नाही तर देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावर आता नक्कीच दिसणार आहे. खो – खो खेळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाला जाण्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. जर आपण सर्वांनी ठरवले तर आंतरराष्ट्रीय खो – खो
चे सामने महाराष्ट्रात खेळवले जातील. जे खेळाडू अतिशय उत्कृष्ठ खेळणार आहेत. त्यांना भारतीय खो – खो महासंघाच्या वतीने देण्यात येणार आहेत, असे मत भारतीय खो – खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्रात कोणत्याही खेळाचे आयोजन करण्यात येते ते एकदम भव्य दिव्य आयोजन करण्यात येते. फलटण ही खो – खो ची पंढरी आहे. फलटणला खो – खोचे जे सामने आयोजित केले जातात त्याचे नियोजन एकदम श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ते अतिशय उत्कृष्ट केले जातात. स्व. पी. जी. शिंदे यांची मोठी उणीव आज जाणवत आहे. ते फलटणच्या राज घराण्याशी एकनिष्ठ होते. क्रिकेट नंतर खो – खो खेळ हा मोठा लोकप्रिय खेळ आहे. खो – खो खेळ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाला जाण्यासाठी आपण सर्व जण कार्यरत आहोत. आगामी काळात त्याला नक्कीच यश येईल, असे मत भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केले.
फलटणला खो – खो ची मोठी परंपरा आहे. फलटणला खो – खोची पंढरी म्हणाले तर वावगे ठरणार नाही. फलटणला सुमारे ५० वर्षांपेक्षा जास्त असा खो खोचा इतिहास आहे. फलटणला विविध खेळांची परंपरा आहे. फलटणला खो खो सोबत, हॉकी, आर्चरी, कुस्ती सह विविध खेळांची फलटणला परंपरा आहे. २४ राज्यातून फलटणला संघ आलेले आहे. २४ किशोर व २४ किशोरी असे मिळून एकूण सुमारे ६५० हून अधिक खेळाडू फलटणमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्रातील खो खो ला खासदार शरद पवार व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे नेहमीच सहकार्य असते. नुकत्याच खो खोच्या आयपीएल सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खो खोला एक वेगळे प्रवेशद्वार उघडले आहे. खो खो खेळाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम खेळाडू करतील असा मला विश्वास आहे, असे मत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.
स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व राज्यातील टीमने मार्च पास काढत खेळाडूंनी मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर मशाल पेटवून सामन्यांचा प्रारंभ करण्यात आला.
फलटणची ओळख असलेल्या फलटण दर्शन या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम संपन्न झाल्यावर फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र सरकरतर्फे देण्यात येणारा अर्जुन पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील असणारी कु. प्रियांका येळे हिला २००९ साली राष्ट्रीय खो – खो स्पर्धेत प्राप्त झालेला विरमाला पुरस्कार, २०११ साली राष्ट्रीय खो – खो स्पर्धेत जानकी पुरस्कार, २०१२ साली राष्ट्रीय खो – खो स्पर्धेत राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, २०१३ साली शिवछत्रपती पुरस्कार मिळाले आहेत. तर संपूर्ण देशामध्ये हे पुरस्कार मिळवणारी कू. प्रियांका येळे ही एकमेव खेळाडू आहे, म्हणून महाराष्ट्र खो – खो असोसिशनकडून तिचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.