दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । सातारा । राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालवधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याचे काम कसे उठावदार दिसेल यासाठी नागरिकांचे आपले सरकार, नागरी सेवा व इतर वेबपोर्टलवरीत 10 सप्टेंबर पर्यंतच्या अर्जांचा जास्तीत जास्त निपटारा करुन पंधरवडा यशस्वी राबवावा, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा शुभारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आला. यावेळी श्री. देसाई बोलत होते. या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, शासन हे सर्वसामान्याचे आहे. शासन गतीने काम करीत आहे. सहाशेच्या आसपास लोककल्याणकारी शासन निर्णय काढले आहेत. शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मुख्य सचिवांनाही सूचना देण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा रोज किती अर्जांचा निपटारा झाला याचा जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी आढावा घ्यावा व तालुकास्तरावर प्रांताधिकारी यांनी आढावा घ्यावा. या पंधरवड्यात जास्तीत जास्त अर्जांचा निपटारा होण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करा व त्यानुसार काम करा. आपण लोकांचे सेवक आहोत या भावनेतून जास्त वेळ काम करावे लागले तर तेही करा.
अर्जांवर जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर निर्णय घ्यायचा आहे त्या अर्जांवर तात्काळ निर्णय घ्या. शासनाकडून काही मदत लागली तर तीही केली जाईल, अशी ग्वाही देवून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा जिल्ह्यात यशस्वी राबवावा, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी (महसूल) श्री. आवटे यांनी केले तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी श्री. थोरवे यांनी मानले.